पुणेकरांसाठी हेल्मेट सक्ती नाही; फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी
: जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
पुणे: पुणेकरांसाठी हेल्मेट सक्ती आताच लागू नाही, असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलंय. काल जे परिपत्रक काढलं त्यात पहिल्या टप्प्यात फक्त शासकीय कर्मचाऱ्यांनाच हेल्मेटसक्ती असेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचं प्रबोधन झाल्यानंतरच सर्वसामान्यांचं प्रबोधन केलं जाईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.
काल हेल्मेट (Pune Helmet) वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून जे आदेश देण्यात आले होते त्यामुळे सर्वसामान्यांना हेल्मेटसक्तीचा समज झाला होता, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी म्हटलंय.
जिल्ह्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती राहणार नाही. परंतु हेल्मेट परिधान करण्याबाबत त्यांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.मोटार वाहन कायद्यानुसार ४ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व सरकारी-निमसरकारी कार्यालये, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचारी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. दुचाकी वापरताना हेल्मेट घातले नसल्यास शिक्षेस पात्र राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी ३१ मार्च रोजी जारी केले होते.या संदर्भात डॉ. देशमुख म्हणाले, जिल्हा प्रशासनाने हेल्मेट सक्ती केलेली नाही. परंतु दुचाकी वाहन चालवताना नागरिकांनी हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. दरम्यान, हेल्मेटबाबत जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २० सहायक मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येकी ४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांचे ५ गट तयार करण्यात आले आहेत. ते अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेट वापरण्याचे फायदे समजून सांगणार आहेत. ही मोहीम शुक्रवार (ता.१) एप्रिलपासून नियमित राबवण्यात येणार आहे.
COMMENTS
चार वर्षांच्या मुलांना हेल्मेट घालून त्यांच्या माना मोडायच्या का? ऑर्थो एक्सपर्ट चे सल्ले घेतले आहेत का?
मी स्वतः ४० वर्षे हेल्मेट वापरत आहे. त्याचे फायदे तोटे थोडे माहीत आहेत. खड्डे, विचित्र स्पिड ब्रेकर सुधारा, अपघाताची खरी कारणे दूर करा. चौकातील डिव्हायडर कमी उंचीचे ठेवा. सुशोभिकरणासाठी संपूर्ण चौक झाकला जातो.लेनची शिस्त पाळण्याचे प्रबोधन करावे शाळांमध्ये किमान दोन तासांचा रहदारीचे नियमावलीचा समावेश असावा.
एक विनंती — जेष्ठांना हेल्मेट पासून सूट द्यावी
मला हेल्मेट आवडते पण आता मानेला झेपत नाही
सूचना अगदी योग्य आहेत.