समाविष्ट गावांतील साडेतीनशे कोटींच्या प्रकल्पाला उद्यापासून सुरुवात
– चार वर्षात पूर्ण होणार प्रकल्प : महापौर मोहोळ
पुणे : समाविष्ट गावांना मुलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी पुणे महापालिका कटिबद्ध असून त्यातीलच महत्त्वाचा भाग असणाऱ्या मल:निसारण व्यवस्थेचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. या अंतर्गत समाविष्ट ११ गावांसाठी मैला वाहिनी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प साकारण्यात येत असून याचे भूमिपूजन उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
समाविष्ट ११ गावांमध्ये शिवणे, संपूर्ण उत्तमनगर, धायरी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, उंड्री, उरुळी देवाची, फुरसुंगी, मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (संपूर्ण साडेसतरानळी), लोहगाव आदी गावांचा समावेश असून मल:निसारण व्यवस्थेचा मास्टर प्लॅन या सर्व गावांसाठी महत्त्वाचा भाग ठरणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘समाविष्ट गावांसाठीची ही कामे ४ वर्षात राबवण्याचे नियोजन केले असून या अंतर्गत ११ गावांमध्ये १८२ किलोमीटर लांबीची मलवाहिनी विकसित करण्यात येत आहे. तसेच मुंढवा येथे १२ एमएलडी क्षमतेचा आणि मांजरी बुद्रुक येथे ९३.५ एमएलडी क्षमतेचा असे दोन मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येत आहेत. यात मांजरी प्रकल्पास देवाची उरुळी, उंड्री, फुरसुंगी, मांजरी तर मुंढवा प्रकल्पास केशवनगर, साडेसतरा नळी, हडपसर (उर्वरित) हा भाग जोडला जाणार आहे’.
‘समाविष्ट गावांचा विकास करताना तो नियोजनबद्ध आणि भविष्याच्या गरजा लक्षात घेऊनच करत आहोत. म्हणूनच मलनिसरण व्यवस्थेचा आधी मास्टर प्लॅन तयार केला गेला आहे. सदरील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचेदेखील नियोजन केले आहे. या मास्टर प्लॅनमधील कामांना ‘७२ ब’ अंतर्गत मान्यताही दिली आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.
अशी असेल ड्रेनेज व्यवस्था
गाव/छोट्या व्यासाची/मोठ्या व्यासाची
◆ शिवणे उत्तमनगर/४.७ किमी/२.२किमी
◆ धायरी/६.१ किमी/३.५ किमी
◆ आंबेगाव खुर्द/६.८ किमी/२.९ किमी
◆ आंबेगाव बुद्रुक/५.२ किमी/४.२ किमी
◆ उंड्री/४.३ किमी/२.१ किमी
◆ उरुळी देवाची/१९ किमी/४.८ किमी
◆ साडेसतरा नळी/१.८ किमी/—-
◆ फुरसुंगी/९ किमी/८.४ किमी
◆ केशवनगर/७.४ किमी/ २.९ किमी
◆ लोहगाव/४८ किमी/१२ किमी
◆ मांजरी बुद्रुक/—/१३ किमी
एकूण/१११ किमी/५६.५ किमी
COMMENTS