Night Curfew : राज्यात नाईट कर्फ्यू : रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी!

HomeBreaking Newsमहाराष्ट्र

Night Curfew : राज्यात नाईट कर्फ्यू : रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी!

Ganesh Kumar Mule Dec 24, 2021 3:24 PM

The process of distribution of 12 lakh property tax bills to Pune residents has started!
PMC : ATMS : राष्ट्रवादीचा विरोध उरला फक्त प्रसारमाध्यमा करिता! 
Loksabha Election Model code of Conduct |  निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करा |जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू

रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी

सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध

मुंबई : राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.  ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील.विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत.  ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे.

आज दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे  अतिरिक्त निर्बंध असतील.

·         संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.
·         लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
·         इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील  उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
·         उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी  क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल.  अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
·         क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
·         वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
·         उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील.  या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
·         याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
·         जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0