PMC Garbage Penalty | दुकानासमोर कचरा आढळल्यास १० हजारांचा दंड, पाचव्यांदा दुकान सील! | पुणे मनपाचे कडक परिपत्रक

पुणे मनपाचे परिपत्रक: खाजगी मोकळ्या जागेतील कचऱ्याची जबाबदारी मालकावर, दुकानासमोर अस्वच्छता आढळल्यास १० हजार ते १ लाख दंड, पाचव्यांदा सील. फेरीवाल्यांना २ डस्टबिन सक्तीचे.

Homeadministrative

PMC Garbage Penalty | दुकानासमोर कचरा आढळल्यास १० हजारांचा दंड, पाचव्यांदा दुकान सील! | पुणे मनपाचे कडक परिपत्रक

Ganesh Kumar Mule Nov 24, 2026 9:00 AM

Pune Potholes | रस्ते खोदाईतून 100 कोटींची कमाई, पण रस्ते मात्र खड्ड्यातच!
Shrinath Bhimale PMC | कात्रज-शनिवारवाडा पेशवेकालीन जलवाहिनीच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा!
Elected Representatives | Administration | लोकप्रतिनिधी आणि प्रशासन –  लोकांसाठी दोघांचीही आवश्यकता! 

PMC Garbage Penalty | दुकानासमोर कचरा आढळल्यास १० हजारांचा दंड, पाचव्यांदा दुकान सील! | पुणे मनपाचे कडक परिपत्रक

| खाजगी मोकळ्या जागेतील कचऱ्याची जबाबदारी मालकावर, फेरीवाल्यांना २ डस्टबिन सक्तीचे

 

Pune Garbage Fine – The Karbhari News Service –  शहरातील खाजगी मोकळ्या जागा, दुकाने, आस्थापना आणि फेरीवाल्यांच्या परिसरातील कचऱ्यावर पुणे महापालिकेने कारवाईचा नवा बडगा उगारला आहे. मोकळ्या जागेत कचरा आढळल्यास त्याची जबाबदारी जागामालकाची असेल. दुकानासमोर अस्वच्छता आढळल्यास मालक किंवा भाडेकरूला १० हजार रुपयांपासून एक लाखापर्यंत दंड होईल, आणि पाचव्यांदा दुकान सील केले जाईल. अतिरिक्त आयुक्त (इ) प्रजित नायर यांनी याबाबत  कार्यालयीन परिपत्रक काढले आहे. (Prajit Nair IAS)

 

केंद्र शासनाने ८ एप्रिल २०१६ च्या अधिसूचनेने घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २०१६ लागू केले आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या प्रकरण १४ मधील कलम ३(ए) व ४, तसेच कलम २४४ आणि ३७६ अन्वये स्वच्छता आणि नियोजन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था व नागरिकांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार पालिकेकडे आहेत, असे परिपत्रकात म्हटले आहे.

अ) खाजगी मोकळ्या जागा : तीन दिवसांत स्वच्छता आणि पत्र्याचे कंपाऊंड

पालिका हद्दीतील खाजगी मोकळ्या जागांवर बहुतांश वेळा कचरा साठलेला आढळतो. त्याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याने यापुढे अशा जागेवर कचरा आढळल्यास त्याची जबाबदारी जागामालकांची असेल, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

प्रक्रिया अशी :

संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जागामालकाला नोटीस देऊन कचरा काढून जागा स्वच्छ करण्यासाठी ३ दिवसांची मुदत देतील.
या मुदतीत जागामालकाला संपूर्ण जागा स्वच्छ करणे, साठलेला कचरा उचलून नेणे आणि जागा नवीन पत्र्याचे कंपाऊंड घालून बंदिस्त करणे बंधनकारक असेल.
मुदतीत कचरा साफ न झाल्यास तो साफ करण्यासाठी वापरलेले मनुष्यबळ आणि मशिनरी यांचा खर्च जागामालकाकडून वसूल केला जाईल. ही रक्कम भरणे मालकावर बंधनकारक आहे.
ही रक्कम वसूल न झाल्यास किंवा मालकाने भरली नाही, तर ती कर वसुलीप्रमाणे त्या जागामालकाच्या महापालिकेकडील मालमत्ता करात समाविष्ट केली जाईल. वारंवार कचरा पडत असल्यास त्याप्रमाणे दंडात्मक रक्कम वसूल केली जाईल.
साफसफाई केलेल्या सर्व मोकळ्या जागांचे आधीचे आणि नंतरचे जिओ-टॅग केलेले फोटो क्षेत्रीय कार्यालयांकडून जतन केले जातील.

ब) व्यावसायिक दुकाने व आस्थापना : १ दिवसाची मुदत, दंडाची शिडी

दुकाने आणि आस्थापनांसमोरही कचरा आणि अस्वच्छता आढळते. त्यामुळे दुकाने, आस्थापनांच्या समोरील बाजू स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची किंवा भाडेकरूची असेल, असे परिपत्रकात म्हटले आहे. अस्वच्छता आढळल्यास सहाय्यक आयुक्त मालक किंवा भाडेकरूला नोटीस देऊन जागा १ दिवसात स्वच्छ करून घेण्यास सांगतील. मुदतीत स्वच्छता न केल्यास पुढील दंड आकारला जाईल :

पहिल्यांदा : १०,००० रुपये
दुसऱ्यांदा : २०,००० रुपये
तिसऱ्यांदा : ५०,००० रुपये
चौथ्यांदा : १,००,००० रुपये
पाचव्यांदा : व्यावसायिक दुकान किंवा आस्थापना सील

क) फेरीवाले : २ डस्टबिन, पाचव्यांदा परवाना रद्द

पालिका हद्दीत फेरीवाला झोन आहेत. झोनमधील फेरीवाल्यांना आपल्या समोरील जागा स्वच्छ ठेवायची आहे. निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ओला आणि सुका कचरा गोळा करण्याकरिता २ डस्टबिनची व्यवस्था त्यांनी करावी लागेल. परिसरात अस्वच्छता किंवा डस्टबिनची व्यवस्था नसल्याचे आढळल्यास दंडाची आकारणी होईल :

पहिल्यांदा : १०,००० रुपये
दुसऱ्यांदा : २०,००० रुपये
तिसऱ्यांदा : ५०,००० रुपये
चौथ्यांदा : १,००,००० रुपये
पाचव्यांदा : फेरीवाल्याचा परवाना रद्द

हा भाग अतिक्रमण विभागाकडील फेरीवाले आणि मंडई (वेंडिंग झोन) यांच्यासाठी आहे.

वसुलीसाठी २४ तासांची मुदत

दंडात्मक रक्कम कर वसुलीप्रमाणे वसूल करण्यासाठी संबंधित जागामालकाच्या पालिकेकडील मालमत्तांची माहिती कर निरीक्षकांनी (SI, DI) २४ तासांच्या आत क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना देणे बंधनकारक असेल, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: