Pavneet Kaur IAS | अतिक्रमणमुक्त पुण्यासाठी महापालिकेचा धडाका! | अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर मैदानात |
Pune Encroachment Drive – The Karbhari News Service – पुणे शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला वेग दिला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या निर्देशानुसार शहरातील विविध भागांत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी गंगाधाम चौक ते लुल्लानगर परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. (Pune Municipal Corporation News)
शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. नागरिकांना रस्त्यांवरून ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील अतिक्रमणे हटवून सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहर अतिक्रमणमुक्त करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शहराच्या विविध भागांत अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत गंगाधाम चौक ते लुल्लानगर परिसरात सुरू असलेल्या कारवाईची अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कारवाईची माहिती घेतली. तसेच अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही अधिक प्रभावी, नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण पद्धतीने करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.
| वाहतुकीतील अडथळे दूर करण्यावर भर
रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवणे, वाहतुकीतील अडथळे दूर करणे आणि पादचाऱ्यांसह वाहनचालकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. अतिक्रमणांमुळे सार्वजनिक रस्त्यांचा वापर मर्यादित होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून कारवाईवर भर दिला जात आहे.
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत एका दिवसात १ लाख ८८ हजार ७५० चौ. फुटांवरील अतिक्रमणांवर कारवाई
पुणे महानगरपालिकेच्या वतीने २२ नोव्हेंबर २०२६ रोजी शहरातील विविध भागांत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १ लाख ८८ हजार ७५० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
झोन क्रमांक १ अंतर्गत वाघोली आणि केसनंद रोड परिसरात ९५ हजार चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. झोन क्रमांक ३ अंतर्गत बाणेर आणि बालेवाडी परिसरात ४१ हजार ५०० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. तर झोन क्रमांक ५ मध्ये ५२ हजार २५० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
झोन क्रमांक २ आणि झोन क्रमांक ४ मध्ये रविवारी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच झोन क्रमांक ६ मध्ये कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे रविवारी कारवाई होऊ शकली नाही. मात्र, या झोनमध्ये सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी कारवाई करण्यासाठी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
अशा प्रकारे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत एका दिवसात एकूण १,८८,७५० चौरस फूट क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले.

COMMENTS