Pune PMC Encroachment Drive | पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर मोठी कारवाई! एकाच दिवशी ९९ हजार चौ. फुटांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
| २७ स्टॉलसह हातगाड्या, पथारी आणि शेड हटविले
Pune PMC News- The Karbhari News Service – पुणे शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) मोठी कारवाई केली. शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत तब्बल ९९ हजार ८७ चौरस फुटांवरील अनधिकृत कच्चे व पक्के बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच रस्ते आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटवून २७ स्टॉल, ४ हातगाड्या, २९ पथाऱ्या, २८ काउंटर आणि १२८ इतर शेड हटविण्यात आले. या कारवाईमुळे सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यासोबतच रस्त्यांवरील अतिक्रमणांना आळा घालण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उप आयुक्त सोमनाथ बनकर (अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग) आणि उप आयुक्त अविनाश सपकाळ (परिमंडळ क्रमांक २) यांच्या नियंत्रणाखाली शनिवारी ही मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईदरम्यान सहाय्यक आयुक्त कैलास बारकुडे, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे, महापालिका सहाय्यक आयुक्त, शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी तसेच एमएसएफचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.
पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाई
महापालिकेच्या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये नगर रोड-वाघोली, शिवाजीनगर-घोलेरोड, सिंहगड रोड, हडपसर-मांजरी-वानवडी आणि बिबवेवाडी या भागांचा समावेश होता.
१. नगर रोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालय
वाघोली बकोरी रोड, आयव्ही इस्टेट रोड आणि आपले घर कल्याणी नगर परिसरात कारवाई करण्यात आली. या ठिकाणी १९ हजार ५०० चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच २७ स्टॉल निष्कासित करण्यात आले. याशिवाय हातगाड्या, सिलेंडर आणि इतर अतिक्रमण साहित्यावरही कारवाई करण्यात आली.
२. शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय
शिल्पा हौसिंग सोसायटी, रामबाग कॉलनी कोथरूड, सुतारवाडी पाषाण, सुस खिंड-मुंडवे गार्डन, यशोदा चौक, नागरस रोड, आर्य भूषण लेन, यशोदीप हॉटेल, फॉरेस्ट हॉटेल आणि ज्ञानेश्वर पादुका चौक आदी परिसरांत कारवाई करण्यात आली.
या भागात एक हजार चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. तसेच २९ पथाऱ्या, ५ काउंटर आणि १० शेडसह व्यावसायिक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
३. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय
गोयल गंगा चौपाटी, वडगाव पूल ते धायरी फाटा, लाडली दुकान लेन ते मानाजी नगर रोड नऱ्हे या परिसरात अतिक्रमण हटविण्यात आले. या ठिकाणी २३ हजार ५८७ चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच हातगाड्या, सिलेंडर आणि इतर शेड हटविण्यात आले.
४. हडपसर-मांजरी, वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय
साधना शाळा, माळवाडी रोड, हडपसर, साळुंखे विहार आणि वानवडी परिसरात कारवाई करण्यात आली. या भागात १५ हजार चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. तसेच ११ पथाऱ्या, ४ सिलेंडर आणि ४२ इतर शेडवर कारवाई करण्यात आली.
५. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय
लेक टाउन ते डॉल्फिन चौक आणि डॉल्फिन चौक ते महेश सोसायटी, बिबवेवाडी या परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी तब्बल ४० हजार चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच १२ काउंटर आणि १३ शेड हटविण्यात आले.
२७ स्टॉल, ४ हातगाड्या आणि १२८ शेड हटविले
या विशेष मोहिमेत महापालिकेने केलेल्या कारवाईचा एकत्रित तपशील पुढीलप्रमाणे आहे.
– अनधिकृत कच्चे व पक्के बांधकाम : ९९,०८७ चौरस फूट
– स्टॉल : २७
– हातगाड्या : ४
– पथाऱ्या : २९
– काउंटर : २८
– सिलेंडर : ११
– इतर शेड : १२८
– व्यावसायिक वाहन : १
अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवून सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यात आल्या.
महापालिका, पोलीस आणि एमएसएफची संयुक्त कारवाई
या मोहिमेसाठी पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागासोबत पोलीस प्रशासन आणि एमएसएफचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. कारवाईदरम्यान १ पोलीस अधिकारी, १३ पोलीस कर्मचारी, ११ एमएसएफ जवान, ११ जेसीबी, १० गॅसकटर, ५ ब्रेकर आणि २९० बिगारी सेवक यंत्रणा उपस्थित होती.
महापालिकेने अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही नियमितपणे सुरू ठेवण्याचे स्पष्ट केले आहे. अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढे देखील वारंवार आणि नियमितपणे कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

COMMENTS