PMC JE Electrical Recruitment | पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदांच्या २२ जागांची भरती | आगामी दहा दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होणार!
| IBPS मार्फत घेतली जाणार लेखी परीक्षा; भरतीची सर्व प्रक्रिया पूर्ण, उमेदवारांचे जाहिरातीकडे लक्ष
PMC JE Bharti – The Karbhari News Service – पुणे महापालिकेच्या विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंता (Junior Engineer – Electrical) अर्थात JE इलेक्ट्रिकल या पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पदांच्या एकूण २२ जागा भरण्यात येणार असून, भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सर्व प्रशासकीय प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. आगामी दहा दिवसांत या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या अभियंता पदवीधारक उमेदवारांना लवकरच अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. (Pune Municipal Corporation Recruitment 2026)
पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. शहरातील पायाभूत सुविधा, विद्युत व्यवस्था तसेच महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या कामकाजासाठी तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंता पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये एकूण २२ पदांचा समावेश आहे. (Pune PMC JE Electrical Recruitment 2026)
या भरतीसाठी महापालिका प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आगामी दहा दिवसांत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यानंतर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी IBPS या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. IBPS संस्थेमार्फत उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे स्वरूप, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची मुदत आणि इतर अटींची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात येणार आहे.
JE स्थापत्यच्या १६९ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण
दरम्यान, यापूर्वी पुणे महापालिकेकडून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीदेखील देण्यात आली आहे. मात्र, या भरती प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा अधिक कालावधी लागल्याचा अनुभव प्रशासनाला आला होता.
त्यामुळे आता JE इलेक्ट्रिकलच्या भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी किंवा तांत्रिक अडचणी राहू नयेत, यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. मागील भरतीप्रमाणे या प्रक्रियेला विलंब होऊ नये, तसेच भरती प्रक्रियेतील कोणताही संभाव्य ‘लूपहोल’ राहू नये, याची दक्षता घेतली जात असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अभियंता उमेदवारांचे जाहिरातीकडे लक्ष
महापालिकेतील सरकारी नोकरीची संधी मिळावी, यासाठी अनेक अभियंता उमेदवार या भरतीची प्रतीक्षा करत आहेत. २२ पदांसाठी भरती होणार असल्याने इच्छुक उमेदवारांचे आता अधिकृत जाहिरातीकडे लक्ष लागले आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया आणि परीक्षेच्या पुढील वेळापत्रकाबाबत स्पष्टता येणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून जाहिरात नेमकी कधी प्रसिद्ध केली जाते, याकडे उमेदवारांचे लक्ष राहणार आहे.

COMMENTS