Ajit Pawar Statue Pune Zilla Parishad | स्मारक आता पुणे जिल्हा परिषदेत; अमित शाह यांच्या हस्ते अनावरण
| नेहरू मेमोरियल हॉलमध्ये कॉफी टेबल बुक आणि लघुपटाचेही प्रकाशन
Amit Shah Pune Tour – The Karbhari News Service – महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेतर्फे त्यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात येणार आहे. येत्या सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे जिल्हा परिषद येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या स्मारकाचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य शरदचंद्र पवार उपस्थित राहणार आहेत. (Pune News)
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषद कॅम्पस येथील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११.५५ वाजता मान्यवरांच्या आगमनाने होणार असून, त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराच्या कमानीचे उद्घाटन करण्यात येईल. या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार आहे. तसेच दिवंगत अजित पवार यांच्या कार्यालयाला समर्पित विशेष छायाचित्र दालनाचे उद्घाटन आणि पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यालाही पुष्पांजली अर्पण केली जाणार आहे.
दुपारी १२.०५ वाजता दिवंगत अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सत्कार करण्यात येईल.
कॉफी टेबल बुकचे अनावरण आणि अजितदादांच्या जीवनावरील लघुपट
नेहरू मेमोरियल हॉल येथे दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या जीवनकार्यावर आधारित लघुपटाचे (Short Film) प्रदर्शनही होणार आहे. अजितदादांच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील योगदानाची माहिती या माध्यमातून अधोरेखित केली जाणार आहे.
पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अजित पवार यांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्याची आणि विकासकामांची आठवण कायम राहावी, तसेच त्यांच्या कार्यातून पुढील पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने हा उपक्रम हाती घेतला आहे.
अजितदादांच्या स्मृती कायम प्रेरणा देत राहतील
पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात माजी उपमुख्यमंत्री तथा माजी पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांच्या या कार्याचे सदैव स्मरण म्हणून जिल्हा परिषदेच्या आवारात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येत आहे. हे स्मारक सदैव प्रेरणा देणारे व लोकसेवेसाठी समर्पणाची शिकवण देणारे ठरेल, अशी भावना जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी व्यक्त केली आहे.
प्रशासन आणि ग्रामीण विकासासाठीच्या कार्याची आठवण
अजित पवार यांच्या कार्याविषयी जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांनीही भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अजितदादांच्या कार्यातून मिळालेल्या प्रशासकीय शिकवणीचा उल्लेख केला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांनी प्रशासनाला लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. कोणतेही काम हे लोकांना केंद्रस्थानी मानून करावे, ही शिकवण त्यांच्याकडून मिळाली. त्यांची ही शिकवण कायम स्मरणात ठेवण्यासाठी हे स्मारक प्रेरणादायी ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनीही अजितदादांच्या ग्रामीण विकासातील योगदानाचा गौरव केला आहे. अजितदादांची संपूर्ण कारकीर्द ही ग्रामीण विकासाचा एक मार्गदर्शक आणि आदर्श परिपाठ आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बदल घडवण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. हे स्मारक सर्वांसाठी मार्गदर्शक व दिशादर्शक ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करणारा हा कार्यक्रम त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाची आणि लोकसेवेतील योगदानाची आठवण करून देणारा ठरणार आहे.

COMMENTS