Arvind Shinde Congress | पुण्यातील झाडणकामाच्या ३५० कोटींच्या कामात गैरव्यवहाराचा आरोप; काँग्रेसचे अरविंद शिंदे आक्रमक
| झाडणकामाच्या प्रायोगिक धोरणाला दिलेली एक वर्षाची मुदतवाढ रद्द करण्याची मागणी; नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याची आयुक्तांकडे मागणी,
Pune PMC News – The Karbhari News Service – पुणे शहरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांच्या झाडणकामासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रायोगिक धोरणाला स्थायी समितीने आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाला विरोध करत काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. सुमारे ३५० कोटी रुपये निविदा मूल्य असलेले झाडणकामाचे प्रस्तावित काम नव्याने निविदा प्रक्रिया न राबविता संबंधित ठेकेदारांना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. हे धोरण रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (PMC Solid Waste Management Department)
पुणे शहरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांच्या झाडणकामासाठी १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर नवीन धोरण राबविण्यात आले होते. या धोरणानुसार झाडणकामाची संपूर्ण जबाबदारी तसेच आवश्यक मनुष्यबळ पुरविण्याचे काम ठेकेदारांकडे सोपविण्यात आले होते. मात्र, या धोरणाचे आर्थिकदृष्ट्या नकारात्मक परिणाम होत असल्याचा दावा अरविंद शिंदे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केला आहे.
गेल्या तीन महिन्यांत शहरातील स्वच्छतेचे प्रमाण वाढल्याचे भासवून महापालिकेच्या तिजोरीची लूट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
लोकप्रतिनिधींच्या विरोधानंतर नवीन निविदा प्रक्रिया सुरू
या प्रायोगिक धोरणातील त्रुटींविरोधात लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांनी विरोध केला होता. त्यानंतर त्रुटींमध्ये सुधारणा करून कायमस्वरूपी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यास प्रशासनाला भाग पाडले होते, असे शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे नवीन निविदेची जाहिरात प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे नवीन निविदा प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करणे तांत्रिक आणि कायदेशीरदृष्ट्या शक्य नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
त्यामुळे ३१ ऑक्टोबर रोजी प्रायोगिक कामाची मुदत संपल्यानंतरही स्थायी समितीने या धोरणाला पुढील एक वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने आचारसंहिता संपुष्टात येण्याच्या शेवटच्या दिवशी घाईघाईत हा निर्णय घेतल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
आठ दिवसांत निविदा प्रक्रिया शक्य असताना मुदतवाढ का?
नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून देण्याऐवजी प्रायोगिक धोरणालाच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याबद्दल अरविंद शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आठ दिवसांच्या अल्प मुदतीतही निविदा प्रक्रिया राबविणे शक्य असताना प्रशासनाने ती प्रक्रिया का पूर्ण केली नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.
या निर्णयामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सुरू असलेल्या कामांमध्ये आर्थिक अनियमिततेला वाव मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
३५० कोटींचे काम विनानिविदा देण्याचा प्रयत्न?
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे सुमारे ३५० कोटी रुपये निविदा मूल्य असलेले प्रस्तावित झाडणकाम. हे काम नव्याने निविदा प्रक्रिया न राबविता संबंधित ठेकेदारांना देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अतिरिक्त आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आयुक्तांनी निर्णय रद्द करावा; अन्यथा न्यायालयात जाणार
महापालिका आयुक्तांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून प्रायोगिक झाडणकाम धोरणाला दिलेली एक वर्षाची मुदतवाढ रद्द करावी. तसेच सुमारे ३५० कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामासाठी पारदर्शक पद्धतीने नवीन निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी अरविंद शिंदे यांनी केली आहे.
पुणेकरांच्या कररूपी पैशांची लूट रोखण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. आयुक्तांच्या निदर्शनास गैरव्यवहार आणून दिल्यानंतरही कारवाई झाली नाही, तर आयुक्तांसह संबंधित प्रशासनाविरोधात न्यायालयीन दाद मागण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.
दरम्यान, काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यांवर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, तसेच झाडणकामाच्या प्रायोगिक धोरणाला दिलेली मुदतवाढ कायम राहते की रद्द होते, याकडे लक्ष लागले आहे.

COMMENTS