PMC Contract Workers Bonus | पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बक्षीस देण्याबाबत आयुक्तांचे परिपत्रक जारी | १८० दिवसांपेक्षा अधिक सेवा केलेल्या कंत्राटी कामगारांना लाभ
| पात्र कामगारांना मिळणार १० हजार रुपये
PMC Contract Workers Bonus – The Karbhari News Service – पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पात्र कंत्राटी कामगारांना दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी १० हजार रुपये देण्याबाबत महापालिका आयुक्त कार्यालयाकडून अधिकृत कार्यालयीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. (Naval Kishore Ram IAS)
महापालिका आयुक्त कार्यालयाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी हे परिपत्रक जारी केले आहे. यापूर्वी स्थायी समितीने दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटदारांमार्फत काम करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधित खातेप्रमुख, विभागप्रमुख, पर्यवेक्षकीय अधिकारी आणि कंत्राटदारांना या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
१८० दिवसांपेक्षा अधिक सेवा केलेल्या कामगारांनाच पात्रता
परिपत्रकानुसार, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटदारांकडे १८० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी कार्यरत असलेल्या पात्र कंत्राटी कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
कामगार कुशल, अर्धकुशल किंवा अकुशल अशा कोणत्याही प्रवर्गातील असला तरी त्याला पात्रतेनुसार ही रक्कम मिळणार आहे. या अनुदानासाठी एकरकमी १० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
NEFT/RTGS द्वारे बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश
दिवाळी सानुग्रह अनुदानाची रक्कम संबंधित कंत्राटदारांमार्फत कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी NEFT किंवा RTGS या माध्यमांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिपत्रकात १९ नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत ही रक्कम जमा करण्याची कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.
कामगारांच्या सेवेसंदर्भातील नोंदी आणि उपस्थिती तपासण्याची जबाबदारी संबंधित पर्यवेक्षकीय अधिकारी आणि कंत्राटदारांवर सोपविण्यात आली आहे.
कंत्राटदार बदलला असला तरी कामगारांना बोनस मिळणार
महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या बाबतीत अनेकदा कंत्राटदार बदलत असतात. त्यामुळे एखाद्या कामगाराने संबंधित आर्थिक वर्षात एका कंत्राटदाराकडे काम केले आणि त्यानंतर दुसऱ्या कंत्राटदाराकडे काम सुरू केले असल्यास बोनस देताना अडचण येऊ नये, यासाठीही परिपत्रकात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या कोणत्याही कंत्राटदाराकडे कार्यरत असलेल्या पात्र कामगारांची दिवाळी बोनसची रक्कम विद्यमान कंत्राटदाराने मागील उपस्थिती तपासून अदा करायची आहे. यासाठी अन्य कंत्राटदारांकडील उपस्थितीची माहिती विद्यमान कंत्राटदाराला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असेल.
बोनसची रक्कम वेतनापासून स्वतंत्र द्यावी
कंत्राटदारांनी कामगारांना दिवाळी सानुग्रह अनुदानाची रक्कम अदा केल्यानंतर त्याबाबतचा स्वतंत्र देयक प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करायचा आहे. हे देयक महिन्याच्या नियमित रनिंग बिलामध्ये समाविष्ट न करता स्वतंत्रपणे तयार करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, दिवाळी बोनसची रक्कम कामगारांना नियमित मासिक वेतनाच्या व्यतिरिक्त अदा करण्यात आली आहे, याची खात्री संबंधित विभागाने करायची आहे. याबाबतचा अहवाल आणि आवश्यक कागदपत्रे देयकासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पात्र कामगार बोनसपासून वंचित राहू नयेत
दिवाळी बोनसच्या वितरणात कोणताही पात्र कामगार वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. पात्र कामगारांना संपूर्ण रक्कम अदा करावी. त्यामधून कोणतीही अनधिकृत कपात केली जाऊ नये, याची खात्री संबंधित विभागप्रमुखांनी करायची आहे.
या निर्णयासाठी संबंधित विभागांनी उपलब्ध अंदाजपत्रकीय तरतुदीतून खर्च करावा. तरतूद अपुरी पडल्यास आवश्यक तरतूद उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
अनियमितता आढळल्यास कारवाईचा इशारा
या संपूर्ण प्रक्रियेवर संबंधित खातेप्रमुख, विभागप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांनी लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बोनस वितरणात कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने यापूर्वीच कंत्राटी कामगारांना १० हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता दिली होती. आता आयुक्तांच्या अधिकृत परिपत्रकामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीचा मार्ग स्पष्ट झाला आहे. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या पात्र कंत्राटी कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.
पुणे मनपात ठेकेदार मार्फत नियुक्त केलेल्या कंत्राटी कामगारांचे वेतन 21 हजार रुपये च्या वर झाल्याने त्यांना बोनस लागू होत नव्हता. त्यामुळे स्थायी समितीने सर्व कंत्राटी कामगारांना दिवाळी बक्षिस जाहीर करून कामगारांची दिवाळी गोड केली आहे. बक्षिस कसे अदा करावे, याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार हे बक्षीस अदा केले जाणार आहे.

COMMENTS