Pune PMC Contract Workers Bonus | पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांना १० हजारांचा दिवाळी बोनस; स्थायी समितीची मान्यता

पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना १० हजार रुपये दिवाळी बोनस देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता.

Homeadministrative

 Pune PMC Contract Workers Bonus | पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांना १० हजारांचा दिवाळी बोनस; स्थायी समितीची मान्यता

Ganesh Kumar Mule Oct 31, 2026 8:09 AM

PMC Contract Employees | पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी!
PMC Contract Employees Bonus | कंत्राटी कामगारांचे वेतन वाढले, मात्र दिवाळी बोनस आणि ESIC ला मुकावे लागणार!
Contract Employees PMC | कंत्राटी कामगारांच्या समस्या दूर करण्यासाठी मनपा ठोस पावले उचलणार – आयुक्त नवल किशोर राम यांचा ठाम शब्द

 Pune PMC Contract Workers Bonus | पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांना १० हजारांचा दिवाळी बोनस; स्थायी समितीची मान्यता

| पुणे महापालिका कामगार युनियनच्या पाठपुराव्याला यश; पाच महिन्यांच्या प्रयत्नांनंतर कंत्राटी कामगारांना दिवाळी भेट

| कंत्राटदारांमार्फत बोनस देण्याच्या सूचना, पैसे न देणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई होणार

 

PMC Standing Committee – The Karbhari News Service –  पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या सर्व खात्यांतील कंत्राटी कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपये दिवाळी बक्षीस (बोनस) देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. पुणे महानगरपालिका कामगार युनियनने गेल्या पाच महिन्यांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती युनियनकडून देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना दिवाळीच्या निमित्ताने आर्थिक दिलासा मिळणार आहे. स्थायी समितीत हा प्रस्ताव  नगरसेवक प्रशांत जगताप, विशाल धनवडे यांनी दिला होता.  (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस मिळावा, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने मागणी करण्यात येत होती. यासंदर्भात प्रशासनाबरोबर लेखी पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर स्थायी समितीमध्ये कंत्राटी कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपये दिवाळी बक्षीस देण्याचा निर्णय मान्य करण्यात आला.

| २१ हजारांच्या वेतन मर्यादेमुळे बोनस बंद

कंत्राटी कामगारांना यापूर्वी वेतनाच्या आधारे बोनस दिला जात होता. मात्र, २१ हजार रुपयांची वेतन मर्यादा ओलांडल्यामुळे अनेक कंत्राटी कामगारांचा बोनस बंद करण्यात आला होता. बोनस बंद झाल्यामुळे कामगारांच्या हातात मिळणाऱ्या एकूण रकमेत घट झाली होती. यामुळे कामगारांमध्ये नाराजी आणि असंतोष निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर बंद झालेला दिवाळी बोनस पुन्हा सुरू करण्याऐवजी तो ‘प्रोत्साहन भत्ता’ म्हणून वेतनामध्ये देण्यात यावा, अशी मागणी पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केली होती. कंत्राटी कामगारांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी युनियनने प्रशासनाकडे हा विषय सातत्याने लावून धरला होता.

| महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने

कंत्राटी कामगारांच्या बोनसचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली होती. या आंदोलनातून कंत्राटी कामगारांना दिवाळी बक्षीस देण्याची मागणी करण्यात आली.

या प्रश्नाची दखल महापौर मंजुषाताई नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, काँग्रेस पक्षाचे प्रशांत जगताप तसेच विविध पक्षांचे गटनेते आणि लोकप्रतिनिधींनी घेतली. कंत्राटी कामगारांच्या दिवाळी बोनसबाबत चर्चा करून यावर्षी प्रत्येकी १० हजार रुपये देण्याचा निर्णय स्थायी समितीमध्ये घेण्यात आला.

| कंत्राटदारांमार्फत दिवाळीपूर्वी बोनस देण्याच्या सूचना

स्थायी समितीने मान्यता दिलेला १० हजार रुपयांचा बोनस संबंधित कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी कंत्राटदारांच्या माध्यमातून अदा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या कंत्राटदारांकडून कंत्राटी कामगारांना बोनसची रक्कम दिली जाणार नाही, अशा कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

त्यामुळे आता संबंधित कंत्राटदारांनी आपल्या कामगारांना बोनसची रक्कम वेळेत अदा करणे अपेक्षित आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी भूमिका युनियनने घेतली आहे.

| रात्री ९.१५ वाजेपर्यंत युनियन पदाधिकाऱ्यांचा ठिय्या

कंत्राटी कामगारांच्या बोनसचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर व्हावा, यासाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सातत्याने प्रयत्नशील होते. हा प्रस्ताव मंजूर झाल्याशिवाय महापालिकेतून निघायचे नाही, अशी भूमिका घेत युनियनचे पदाधिकारी रात्री ९.१५ वाजेपर्यंत ठाण मांडून बसले होते. अखेर स्थायी समितीमध्ये १० हजार रुपयांच्या बोनसला मान्यता मिळाल्यानंतर या प्रयत्नांना यश आले.

गेल्या पाच महिन्यांपासून केलेला पत्रव्यवहार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींबरोबरच्या बैठका, निदर्शने आणि अखेरपर्यंत सुरू ठेवलेला पाठपुरावा यानंतर कंत्राटी कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपये दिवाळी बक्षीस देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता मिळाली आहे. आता कंत्राटदारांमार्फत प्रत्यक्ष कामगारांच्या हातात ही रक्कम कधी पडते, याकडे कंत्राटी कामगारांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: