Pavneet Kaur IAS | मोटेरोझा प्रकरणात आर्किटेक्टचा परवाना निलंबित, विकासकाची कामे बंद | दोन अभियंत्यांची विभागीय चौकशी

मोटेरोझा प्रकल्पाच्या भोगवटापत्र प्रकरणी आर्किटेक्ट, विकासक आणि अभियंत्यांवर कारवाईचे निर्देश.

Homeadministrative

Pavneet Kaur IAS | मोटेरोझा प्रकरणात आर्किटेक्टचा परवाना निलंबित, विकासकाची कामे बंद | दोन अभियंत्यांची विभागीय चौकशी

Ganesh Kumar Mule Oct 30, 2026 8:33 AM

Bonus | contract workers | मनपा कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यास प्रशासन सकारात्मक | कामगार नेते सुनील शिंदे यांची माहिती
Pune Ganesh Visarjan | PMC Pune | पुणे महापालिकेकडून बांधलेले हौद, टाक्यामध्ये ५ लाख ६१ हजार ४२८ गणेश मूर्तीचे विसर्जन 
Finance Committee | PMC Pune | ६ महिने उलटूनही वित्तीय समितीने मान्य केलेल्या कामांचे कार्यादेश नाहीत | महापालिका आयुक्त करणार शिस्तभंगाची कारवाई

Pavneet Kaur IAS | मोटेरोझा प्रकरणात आर्किटेक्टचा परवाना निलंबित, विकसकाची कामे बंद | दोन अभियंत्यांची विभागीय चौकशी

| अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे निर्देश

| आर्किटेक्टला काळ्या यादीत टाकण्यासह विकासकाचे बांधकाम प्रस्ताव स्थगित ठेवण्याचे आदेश

 

 

Pune PMC News – The Karbhari News Service –  हिंगणे खुर्द येथील मोटेरोझा बांधकाम प्रकल्पाला अंतिम भोगवटापत्र देताना आवश्यक तपासणी आणि पडताळणी करण्यात आली नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर यांनी संबंधित आर्किटेक्टचा परवाना किमान एक वर्षासाठी निलंबित करण्याचे, त्यांचा काळ्या यादीत समावेश करण्याचे तसेच संबंधित विकासकाची महापालिका हद्दीतील सुरू असलेली बांधकामे थांबविण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय या प्रकरणाशी संबंधित दोन अभियंत्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे पेठ हिंगणे खुर्द येथील सर्व्हे क्रमांक १९, हिस्सा क्रमांक ५, ७, १०, ११ आणि १२ मधील प्लॉट क्रमांक ६ येथे मोटेरोझा हा बांधकाम प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाला देण्यात आलेल्या अंतिम भोगवटापत्रासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालाची दखल घेत अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी  शहर अभियंत्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात अंतिम भोगवटापत्र देताना प्रत्यक्ष जागेवरील बांधकामाची मान्य नकाशानुसार पूर्तता झाली आहे किंवा नाही, याची पुरेशी तपासणी करण्यात आली नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच प्रकल्पाला देण्यात आलेल्या पर्यावरणविषयक ना हरकत दाखल्यातील अटींचे पालन झाले आहे का, पर्यावरण मंजुरीनुसार आवश्यक असलेली संमतीपत्रे प्राप्त झाली आहेत का, याचीही खातरजमा करण्यात आली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. प्रत्यक्षात काही कामे अपूर्ण असतानाही अंतिम भोगवटापत्र देण्यात आल्याचे निरीक्षण प्रशासनाने नोंदवले आहे.

आर्किटेक्टवर कारवाईचे निर्देश

या प्रकरणात संबंधित आर्किटेक्ट मे. आयडिया इमेजेस यांच्यामार्फत काम पाहणारे विलास जगन्नाथ येले यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. जागेवरील कामे अपूर्ण असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिल्यामुळे महापालिकेची दिशाभूल झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर येले यांची पुणे महापालिका क्षेत्रातील आर्किटेक्ट म्हणून असलेली नोंदणी अथवा परवाना किमान एक वर्षासाठी तात्काळ प्रभावाने निलंबित करावा, तसेच त्यांचा काळ्या यादीत समावेश करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या इतर बांधकाम प्रस्तावांचीही नियमानुसार तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

विकासकाची सुरू असलेली कामे थांबविणार

या प्रकरणातील संबंधित मालक आणि विकासक तुषार बिल्डर्स आणि बी.के. इन्फ्रा एलएलपी, ललित कुदळे यांच्यामार्फत तुषार संभाजी गोसावी व इतर संबंधितांवरही कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या विकासकांची पुणे महापालिका हद्दीतील सुरू असलेली सर्व बांधकामे तातडीने थांबवावीत, तसेच पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांचे दाखल असलेले बांधकाम प्रस्ताव स्थगित ठेवावेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दोन अभियंत्यांविरुद्ध विभागीय चौकशी

या संपूर्ण प्रकरणात महापालिकेच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी होणार आहे. प्रकरणाशी संबंधित कनिष्ठ अभियंता निशिकांत छापेकर आणि उपअभियंता राहुल तिखे यांच्याविरुद्ध विहित कर्तव्यामध्ये कसूर आणि हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून विभागीय चौकशी प्रस्तावित करून ती तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील कारवाई केवळ संबंधित प्रकल्पापुरती मर्यादित न ठेवता आर्किटेक्टच्या इतर सुरू असलेल्या कामांची तपासणी, विकासकाच्या बांधकाम प्रस्तावांवरील निर्बंध आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यापर्यंत नेण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी, प्रत्यक्ष कामांची पूर्तता आणि अंतिम भोगवटापत्र देण्याच्या प्रक्रियेत जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने या आदेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी शहर अभियंत्यांना या सर्व कारवाईचा अनुपालन अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले असून, पुढील कारवाईबाबत वेळोवेळी प्रशासनाला अवगत करण्याचेही निर्देश दिले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0