Ather Energy Pune PMC | पुण्यातील खड्डे शोधण्यासाठी Ather च्या स्कूटर्सची मदत| रस्त्यांवरील खड्डे, रोड कट्स आणि स्पीड ब्रेकरची माहिती मिळणार

Ather च्या कनेक्टेड स्कूटर्समधून मिळणाऱ्या रस्त्यांवरील अडथळ्यांच्या माहितीचा उपयोग दुरुस्ती नियोजनासाठी केला जाणार.

Homeadministrative

Ather Energy Pune PMC | पुण्यातील खड्डे शोधण्यासाठी Ather च्या स्कूटर्सची मदत| रस्त्यांवरील खड्डे, रोड कट्स आणि स्पीड ब्रेकरची माहिती मिळणार

Ganesh Kumar Mule Oct 29, 2026 9:23 PM

Aapala Dawakhana in Pune | आपला दवाखाना सद्यस्थिती व निधीबाबत आढावा
Pune Water Cut | पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटली असल्याने या परिसरातील पाणीपुरवठा शुक्रवारी राहणार बंद!
New Year Holiday PMC Pune | पुणे महापालिकेच्या कार्यालयांना नवीन वर्षातील सुट्ट्या जाही

Ather Energy – Pune PMC | पुण्यातील खड्डे शोधण्यासाठी Ather च्या स्कूटर्सची मदत| रस्त्यांवरील खड्डे, रोड कट्स आणि स्पीड ब्रेकरची माहिती मिळणार

| महापालिकेशी सामंजस्य करार ; दुरुस्तीच्या कामांचे प्राधान्य ठरविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

 

Pune PMC News – The Karbhari News Service – पुणे शहरातील रस्त्यांची स्थिती अधिक प्रभावीपणे जाणून घेण्यासाठी आणि खड्डे तसेच खराब रस्त्यांचे पट्टे ओळखून दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि Ather Energy Limited यांच्यात तंत्रज्ञानाधारित सहकार्य करण्यात येत आहे. यासाठी २९ ऑक्टोबर  रोजी दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. Ather च्या कनेक्टेड इलेक्ट्रिक स्कूटर्समधून संकलित होणाऱ्या रस्त्यांवरील अडथळ्यांच्या माहितीचा उपयोग महापालिकेच्या रस्ते व्यवस्थापनासाठी पूरक माहिती म्हणून केला जाणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

या सहकार्यामुळे शहरातील रस्त्यांवरील खड्डे, रस्ते खोदकामामुळे निर्माण झालेले कट्स, स्पीड ब्रेकर आणि रस्त्यांच्या पृष्ठभागावरील अन्य अडथळे ओळखण्यासाठी महापालिकेला अतिरिक्त डिजिटल माहिती उपलब्ध होणार आहे. या माहितीच्या आधारे कोणत्या रस्त्यांची दुरुस्ती आधी करावी, कोणत्या ठिकाणी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे आणि वारंवार समस्या निर्माण होणाऱ्या ठिकाणांवर कसे लक्ष ठेवावे, याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.

२४ हजारांहून अधिक स्कूटर्सच्या माहितीचा उपयोग

Ather Energy च्या प्रस्तावानुसार, पुणे शहरात कंपनीच्या २४ हजारांहून अधिक स्कूटर्स कार्यरत आहेत. या कनेक्टेड वाहनांमध्ये असलेल्या टेलिमेट्री आणि सेन्सर-आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाहनांच्या नियमित प्रवासादरम्यान रस्त्यांच्या स्थितीशी संबंधित माहिती संकलित केली जाते.

या प्रणालीअंतर्गत पुणे महापालिकेला एकत्रित स्वरूपातील जीपीएस आणि भौगोलिक स्थानावर आधारित रस्त्यांवरील अडथळ्यांची माहिती उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. या माहितीमध्ये खड्डे, रोड कट्स, स्पीड ब्रेकर आणि रस्त्यांच्या पृष्ठभागावरील अन्य अडथळ्यांच्या स्थानाचा समावेश असेल. तसेच, या माहितीच्या आधारे रस्त्यांच्या स्थितीचे चित्र दर्शविणारे ‘रोड हेल्थ मॅप्स’ तयार करण्यासाठी मदत होणार आहे.

दुरुस्तीच्या कामांचे प्राधान्य ठरविण्यास मदत

महापालिकेच्या रस्ते देखभाल यंत्रणेला या डिजिटल माहितीचा उपयोग करून समस्या असलेले रस्ते आणि ठिकाणे अधिक प्रभावीपणे ओळखता येतील. दुरुस्तीच्या कामांचे प्राधान्यक्रम ठरविणे, आवश्यक त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून उपाययोजना करणे आणि वारंवार रस्त्यांची समस्या निर्माण होणाऱ्या भागांचे निरीक्षण करणे यासाठी या माहितीचा उपयोग होऊ शकतो.

सध्या रस्त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी आणि महापालिकेच्या विद्यमान देखभाल प्रक्रियेचा आधार घेतला जातो. Ather कडून उपलब्ध होणारी माहिती या प्रक्रियेला पूरक ठरणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी, अभियंत्यांचे निरीक्षण आणि डिजिटल माहिती यांची सांगड घालून रस्ते दुरुस्तीचे नियोजन करण्याची संधी महापालिकेला मिळणार आहे.

नागरिकांचा वैयक्तिक डेटा दिला जाणार नाही

या सहकार्यामध्ये नागरिकांचा किंवा Ather ग्राहकांचा वैयक्तिक डेटा पुणे महापालिकेला दिला जाणार नसल्याचे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेला केवळ एकत्रित स्वरूपातील भौगोलिक स्थानावर आधारित माहिती उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

मात्र, ही माहिती वाहनांच्या प्रत्यक्ष प्रवासावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्याची किंवा प्रत्येक खड्ड्याची माहिती या प्रणालीतून मिळेलच, असे नाही. तसेच, स्वयंचलितरीत्या संकलित होणाऱ्या माहितीच्या अचूकतेची स्वतंत्र हमी देण्यात आलेली नसल्याने प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी महत्त्वाची राहणार आहे.

एक वर्षासाठी सहकार्य

पुणे महापालिका आणि Ather Energy यांच्यातील प्रस्तावित सामंजस्य कराराचा कालावधी एक वर्षाचा आहे. या कालावधीत कनेक्टेड मोबिलिटीमधून उपलब्ध होणाऱ्या माहितीचा शहरातील रस्ते व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी कितपत प्रभावी उपयोग करता येईल, याची चाचपणी केली जाणार आहे.

या उपक्रमामुळे रस्त्यांची स्थिती ओळखण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या माहितीचा विस्तार होऊ शकतो. तथापि, प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे, त्यांचे प्राधान्यक्रम आणि अंतिम निर्णय महापालिकेच्या पडताळणी व प्रशासकीय प्रक्रियेनुसार घेतले जाणार आहेत.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, रस्त्यांवरील त्रुटी वेळेत ओळखणे हे प्रभावी रस्ते देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. या सहकार्यामधून उपलब्ध होणारा डेटा समस्या असलेले रस्ते ओळखणे, दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देणे आणि वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांचे निरीक्षण करण्यासाठी अतिरिक्त माहिती म्हणून उपयोगी ठरेल.

तंत्रज्ञानाधारित माहिती आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी यांची सांगड घालून पुण्यातील रस्ते व्यवस्थापन अधिक डेटा-आधारित आणि परिणामकारक करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) प्रजित नायर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप उपस्थित होते.

Ather Energy च्या वतीने हेड ऑफ प्रॉडक्ट अँड चीफ ऑफ स्टाफ मिलिंद कोठेकर, कॉर्पोरेट, लीगल अँड पब्लिक पॉलिसी विभागाचे डॉ. सुरेंदर सिंग्रोहा, सीनियर प्रॉडक्ट मॅनेजर ऋषिकेश प्रधान आणि गव्हर्नमेंट रिलेशन्स अँड पॉलिसी विभागाचे अमोल मोहिते उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: