Pune Graduate Teacher Vote Counting |  पदवीधर मतदारसंघासाठी १००, तर शिक्षक मतदारसंघासाठी ४२ टेबलवर मतमोजणी; यंत्रणा सज्ज

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज.

Homeadministrative

Pune Graduate Teacher Vote Counting |  पदवीधर मतदारसंघासाठी १००, तर शिक्षक मतदारसंघासाठी ४२ टेबलवर मतमोजणी; यंत्रणा सज्ज

Ganesh Kumar Mule Oct 26, 2026 9:27 PM

Pune News | नैसर्गिक ओढे – नाल्यांचा प्रवाह रोखणाऱ्यांविरोधात नोंदवले गुन्हे
Janata Vasahat TDR | जनता वसाहत TDR प्रमाणे बीडीपी बाबत देखील निर्णय घ्या | माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 
Chandani Chowk Bhugaon Road | चांदणी चौक – भूगाव मार्ग – २०० कोटींची रक्कम तीन वर्षात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केली जाणार!

Pune Graduate Teacher Vote Counting |  पदवीधर मतदारसंघासाठी १००, तर शिक्षक मतदारसंघासाठी ४२ टेबलवर मतमोजणी; यंत्रणा सज्ज

| बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात मंगळवारी मतमोजणी

| अचूकता, पारदर्शकता आणि समन्वय राखण्याचे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे निर्देश

 

Pune Division Election – The Karbhari News Service  –  पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. पदवीधर मतदारसंघासाठी १००, तर शिक्षक मतदारसंघासाठी ४२ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीची प्रक्रिया अचूक, शांततेत आणि समन्वयाने पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले. (Pune News)

मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण मतमोजणी कक्षात आयोजित करण्यात आले होते. यावेळी विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

| मतमोजणीत चूक होणार नाही, याची दक्षता घ्या

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत कोणतीही चूक होऊ न देता, शांततेत आणि कोणतेही दडपण न घेता काम करावे. आवश्यक नमुने व्यवस्थित भरून संबंधित पथकाकडे जमा करावेत. मतपत्रिका वैध की अवैध याबाबतचे मुद्दे आणि आक्षेप योग्य पद्धतीने निकाली काढावेत, अशा सूचना शीतल तेली-उगले यांनी दिल्या.

मतपत्रिकांवरील पसंतीक्रमानुसार मतमोजणी होणार असल्याने प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक टेबलवरील पथकाने अचूक काम करावे. टेबलवरील पर्यवेक्षक, सहायक, संबंधित अधिकारी आणि माहिती संकलन करणाऱ्या पथकांमध्ये समन्वय असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मतमोजणीच्या दिवशी कोणतीही संदिग्धता राहू नये, यासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. निवडणुकीचे नियम, सूचना आणि कार्यपद्धतींचा अभ्यास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

| मतमोजणी प्रक्रियेचे प्रात्यक्षिक

अपर जिल्हाधिकारी तथा महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर यांनी शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना, तर सह आयुक्त संजय पलांडे यांनी पदवीधर मतदारसंघातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यावेळी मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित शंकांचे निरसन करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान मतपेट्या उघडणे, ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे, विविध नमुने भरणे, मतपत्रिकांचे वैध-अवैध वर्गीकरण करणे आणि प्रत्येक फेरीनुसार निकालाचा नमुना जमा करणे या प्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या सुविधा आणि नियोजनाची माहितीही देण्यात आली.

| पदवीधर मतदारसंघासाठी पाच कक्षांत व्यवस्था

पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी एकूण १०० टेबल असतील. पाच कक्षांमध्ये प्रत्येकी १० टेबलच्या दोन रांगा, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी एकूण ४२ टेबल असतील. तीन कक्षांमध्ये प्रत्येकी सात टेबलच्या दोन रांगा, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक आणि एक शिपाई असा कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात आला आहे. निर्धारित नियमांनुसार आणि काटेकोरपणे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: