PMC Property Tax Assessment | मिळकतकर आकारणीसाठी ‘सेल्फ असेसमेंट’ प्रणाली विकसित करा; विरोधी पक्षनेते निलेश निकम यांची मागणी
| रेडी रेकनरच्या आधारे वार्षिक करपात्र रक्कम निश्चित करण्याची व्यवस्था करा; नागरिकांचे हेलपाटे आणि गैरप्रकार रोखण्यावर भर
Nilesh Nikam PMC – The Karbhari News Service – पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागात नवीन मिळकतींची कर आकारणी करताना नागरिकांना करावा लागणारा त्रास कमी करण्यासाठी स्वतंत्र ‘सेल्फ असेसमेंट’ (स्वयंमूल्यांकन) संगणक प्रणाली विकसित करण्याची मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते अॅड. निलेश निकम यांनी केली आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना आपल्या मिळकतीची माहिती ऑनलाइन भरून रेडी रेकनरच्या आधारे वार्षिक करपात्र रक्कम निश्चित करून घेता येईल. त्यामुळे कर आकारणी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासह नागरिकांचे महापालिकेतील हेलपाटे कमी होतील, असा दावा निकम यांनी केला आहे. (Pune Property Tax)
यासंदर्भात निकम यांनी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) यांना निवेदन दिले आहे. शहरात दरवर्षी अनेक नवीन मिळकती तयार होत असतात. मात्र, या मिळकतींची कर आकारणी करण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अर्ज केल्यानंतरही नागरिकांना अनेक महिने महापालिकेत चकरा माराव्या लागतात, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
| करपात्र रक्कम निश्चित करताना पारदर्शकतेचा अभाव?
मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम निश्चित करताना पारदर्शकता नसल्यामुळे गैरप्रकार होत असल्याच्या आणि नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे वारंवार येत असल्याचे निकम यांनी म्हटले आहे. त्यामुळे कर आकारणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
| रेडी रेकनरच्या आधारे वाजवी भाडे निश्चित करा
सन २००७-०८ मध्ये पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत वार्षिक करपात्र रक्कम निश्चित करण्याबाबत धोरण तयार करण्यात आले होते. त्यानुसार मिळकतीचे वाजवी भाडे शासनाच्या रेडी रेकनरचा आधार घेऊन निश्चित करण्याची तरतूद असल्याचे निकम यांनी निवेदनात म्हटले आहे.
मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून नवीन मिळकतींची करपात्र रक्कम निश्चित करताना केवळ काही पैशांची वाढ करून रक्कम ठरविली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रेडी रेकनरच्या दरातील वाढीनुसार मिळकतीचे वाजवी भाडे वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ज्या भागातील रेडी रेकनरचे दर कमी आहेत, त्या भागातील मिळकतींना त्यानुसार कमी दराने वाजवी भाडे आकारणे योग्य ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
| क्षेत्रफळ आणि पत्ता टाकताच करपात्र रक्कम समजणार
मिळकतकर विभागासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्याची मागणी निकम यांनी केली आहे. या प्रणालीमध्ये नागरिकांना आपल्या मिळकतीचे चौरस फुटांतील क्षेत्रफळ, पत्ता, सर्व्हे क्रमांक आणि सीटीएस क्रमांक यांसारखी माहिती भरता येईल. त्यानंतर संबंधित भागातील रेडी रेकनरच्या आधारे वाजवी भाड्याचा दर स्वयंचलितपणे सूचित होऊन मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम निश्चित होण्यास मदत होईल, अशी संकल्पना त्यांनी मांडली आहे.
या प्रणालीमुळे नवीन मिळकतींची कर आकारणी त्वरित करता येईल आणि महापालिकेला कराच्या स्वरूपात निधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे निकम यांनी म्हटले आहे.
| तपासणीमुळे फसवणुकीलाही आळा बसण्याची अपेक्षा
स्वयंमूल्यांकन प्रणालीमुळे नागरिकांना कर आकारणीची प्रक्रिया समजण्यास मदत होईल. तसेच नागरिकांनी नोंदविलेल्या क्षेत्रफळाची महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष तपासणी करून खात्री करता येईल. त्यामुळे क्षेत्रफळाबाबत चुकीची माहिती देऊन महापालिकेची फसवणूक होण्यास आळा घालता येईल आणि कर आकारणीत पारदर्शकता राखता येईल, असे निकम यांनी निवेदनात म्हटले आहे.
नागरिकांचा वेळ वाचविणे, कर आकारणीतील संभाव्य गैरप्रकार रोखणे आणि महापालिकेच्या महसूल प्रक्रियेला गती देणे यासाठी ही संगणक प्रणाली तातडीने विकसित करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी अॅड. निलेश निकम यांनी केली आहे.

COMMENTS