PMC Dengue News | डेंग्यू उपचारासाठी महापालिका रुग्णालयांत ३३३ खाटा उपलब्ध | आयुक्त नवल किशोर राम यांची नायडू रुग्णालयाला भेट
| पुण्यात डेंग्यूचे २,२९१ रुग्ण; | १४ लाख घरांची तपासणी, ६.३० लाखांचा दंड वसूल
Naval Kishore Ram IAS – The Karbhari News Service – पुणे शहरातील डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शनिवारी (२४ ऑक्टोबर) बाणेर येथील डॉ. नायडू संसर्गजन्य आजार रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. डेंग्यूच्या उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये पुरेशा खाटा आणि औषधसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागासह बांधकाम, अतिक्रमण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाने समन्वयाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. (PMC Health Department)
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात २०२४ मध्ये डेंग्यूच्या ४,९०८ रुग्णांची, तर २०२५ मध्ये २,३९१ रुग्णांची नोंद झाली. २०२६ मध्ये २० ऑक्टोबरपर्यंत २,२९१ रुग्ण आढळले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे.
| महापालिका रुग्णालयांत ३३३ खाटा उपलब्ध
डेंग्यूच्या रुग्णांसाठी पुणे शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये ४,४०९ खाटा उपलब्ध असून, त्यापैकी ६७० खाटा अतिदक्षता विभागातील आहेत. महापालिका रुग्णालयांमध्ये ३३३ खाटा उपलब्ध असून, त्यापैकी सहा खाटा अतिदक्षता विभागातील आहेत. एकूण उपलब्ध खाटांपैकी सरासरी ५० टक्के खाटा उपलब्ध असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
डॉ. नायडू रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी दररोज सरासरी १० ते १५ खाटा वापरात असून, सुमारे ३५ खाटा रिक्त असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या रुग्णालयात डेंग्यूवरील उपचार पूर्णपणे मोफत आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने कमला नेहरू आणि नायडू रुग्णालयात उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, डेंग्यू वॉर्डमध्ये रुग्णांसाठी मच्छरदाणीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
| १४ लाख घरांची तपासणी; ६.३० लाखांचा दंड
डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेच्या पथकांनी शहरातील सुमारे १४ लाख घरांना भेटी दिल्या. या मोहिमेत २८ लाख ३१ हजार ३८६ पाण्याची भांडी आणि साठवणुकीच्या कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे १३ हजार घरांमध्ये १८ हजार ८८५ कंटेनरमध्ये एडीस डासांच्या अळ्या आढळल्या.
डासोत्पत्ती आढळलेल्या ठिकाणी कारवाई करताना २,६६४ मिळकतींना नोटिसा बजावण्यात आल्या असून, एकूण सहा लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांनी घराच्या आसपास पाणी साचू देऊ नये, पाण्याची भांडी झाकून ठेवावीत आणि आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
| बांधकामे, पाणी साठवणुकीवर लक्ष
वातावरणातील बदल, वाढती बांधकामे, पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवणे, तसेच इनडोअर प्लांट्स आणि टेरेस गार्डनमधील कुंड्या व ताटल्यांमध्ये साचणारे पाणी यामुळे एडीस डासांची उत्पत्ती वाढण्यास मदत होत असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर बांधकामांच्या ठिकाणी साचलेले पाणी, कचरा डेपो आणि अतिक्रमणाच्या ठिकाणी होणारी डासोत्पत्ती रोखण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. ज्या भागांमध्ये डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळत आहेत, त्या हॉटस्पॉट परिसरात प्राधान्याने औषधफवारणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
धूरफवारणी करताना उघड्या जागांवर सरसकट फवारणी न करता, रुग्णाच्या घरात आणि लगतच्या बंदिस्त परिसरात प्रभावी पद्धतीने सुमारे २० मिनिटे फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, पाणी साठवून ठेवलेल्या ठिकाणी जैविक अळीनाशकांचा नियमित वापर केला जाणार आहे.
| मोफत तपासणीची सुविधा; खासगी रुग्णालयांनाही निर्देश
डेंग्यूचे निदान लवकर व्हावे, यासाठी पुणे महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये रॅपिड डायग्नोस्टिक किट्स (RDK) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डॉ. नायडू रुग्णालय, डॉ. कोटणीस रुग्णालय आणि कमला नेहरू रुग्णालय या सेंटिनेल केंद्रांमध्ये रक्ताच्या नमुन्यांची मोफत पुष्टीकरण चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांनी डेंग्यू रुग्णांची माहिती IHIP पोर्टलवर नोंदवणे अनिवार्य करण्यात आले आहे. रुग्णांची दुबार नोंद होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
| घंटागाड्यांद्वारे जनजागृती
डेंग्यू प्रतिबंधासाठी महापालिकेने जनजागृती मोहीमही तीव्र केली आहे. रेल्वे स्थानकांवरील डिजिटल फलक आणि रेडिओच्या माध्यमातून नागरिकांना माहिती दिली जात आहे. कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांवर दररोज डेंग्यू प्रतिबंधाबाबत ध्वनिमुद्रित संदेश प्रसारित केले जात आहेत. यासाठी सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांना ऑडिओ पेनड्राइव्ह वितरित करण्यात आले आहेत.
गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्षांना गच्ची आणि पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवण्याबाबत पत्रे पाठविण्यात येत आहेत. शाळांमध्ये निबंध आणि चित्रकला स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्येही जनजागृती केली जात आहे.
आयुक्तांच्या पाहणीवेळी महापालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी परिसरात पाणी साचू देऊ नये, महापालिकेच्या तपासणी पथकांना सहकार्य करावे आणि डेंग्यूची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेत उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

COMMENTS