PMC Padmavati Metro Station | पद्मावती मेट्रो स्टेशनसाठी धनकवडीतील ट्रक टर्मिनसची ६६५ चौ.मी. जागा मालकी हक्काने महामेट्रोला

PMC Pune Building

Homeadministrative

PMC Padmavati Metro Station | पद्मावती मेट्रो स्टेशनसाठी धनकवडीतील ट्रक टर्मिनसची ६६५ चौ.मी. जागा मालकी हक्काने महामेट्रोला

Ganesh Kumar Mule Oct 08, 2026 11:50 AM

PMC Solid Waste Management Department | इंदौर दौऱ्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून तात्काळ उपाययोजना सुरु | आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना दिले जाणार प्रशिक्षण 
BJP Delegation | पुणेकरांवर करवाढीचा बोजा नको | महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर भाजप शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी
Pune PMC News | पुणे महापालिका सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना २५ लाखांचा समूह अपघात विमा!  | मुख्य कामगार अधिकाऱ्यांचे परिपत्रक जारी 

PMC Padmavati Metro Station | पद्मावती मेट्रो स्टेशनसाठी धनकवडीतील ट्रक टर्मिनसची ६६५ चौ.मी. जागा मालकी हक्काने महामेट्रोला

| सव्वा तीन कोटींचे मनपाचे दायित्व, एका भाडेपट्टाधारकाचा करार रद्द  |

 

PMC Padmavati Metro Land – The Karbhari News Service – स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गिकेवरील पद्मावती मेट्रो स्टेशनच्या बांधकामासाठी धनकवडी येथील पुणे महानगरपालिकेच्या मालकीची ६६५ चौरस मीटर जागा पुणे मेट्रो रेल प्रकल्पाला मालकी हक्काने हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने शहर सुधारणा समितीसमोर ठेवला आहे. या प्रस्तावानुसार जागेच्या मूल्यांकनाच्या दुप्पट म्हणजेच ३ कोटी ९१ लाख ५५ हजार २०० रुपयांचे दायित्व महामेट्रोमार्फत मनपाच्या आर्थिक दायित्वात समायोजित केले जाणार आहे.  हा प्रस्ताव  शहर सुधारणा समिती समोर चर्चेसाठी ठेवण्यात आला असून, स्थायी समिती व अंतिमतः मुख्य सभेच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. (PMC City Improvement committee)

काय आहे प्रस्ताव?

पुणे मेट्रो रेल्वे टप्पा-१ साठी पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या २० जमिनी यापूर्वी भाडेपट्ट्याने हस्तांतरित करण्यात आल्या होत्या. या जमिनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ४५० अ अन्वये राज्य शासनास प्राप्त अधिकारानुसार बिनशर्त मालकी हक्काने देण्यास महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार (दि. २८/०४/२०२५) मान्यता देण्यात आली आहे. हस्तांतरित जमिनीच्या अधिमूल्याची रक्कम प्रकल्पाच्या वित्तीय सहभाग आराखड्यानुसार संबंधित महानगरपालिकेने द्यावयाच्या वित्तीय सहभागात समायोजित करण्याचे आदेश या शासन निर्णयात आहेत.

त्याच धर्तीवर, पद्मावती मेट्रो स्टेशनच्या बांधकामासाठी महामेट्रोने ९ जानेवारी २०२६ रोजीच्या मागणीपत्राद्वारे धनकवडीतील सर्व्हे क्र. १९ अ/४ अ व ब येथील एकूण ७०२ चौ.मी. क्षेत्रापैकी ६६५ चौ.मी. जागा (मनपाच्या ताब्यातील ट्रक टर्मिनस आरक्षित जागा) कायमस्वरूपी मिळावी, अशी विनंती केली होती.

जागेचा इतिहास: ट्रक टर्मिनलसाठी संपादन, हँगिंग गार्डनमधील व्यावसायिकांचे पुनर्वसन

धनकवडी सर्व्हे क्र. १९ अ/४ अ येथील १ एकर १८ गुंठे व सर्व्हे क्र. १९ अ/४ ब येथील ५ एकर १८ गुंठे जागा ट्रक टर्मिनलसाठी मान्य विकास आराखड्यानुसार भूसंपादन कायद्यान्वये मनपाच्या ताब्यात घेण्यात आली होती. या जागेमध्ये पुणे पेठ सदाशिव सि.स.नं. २१६६ ते २१६८, नगर रचना योजना क्र. ३, अंतिम भूखंड क्र. ३६ ही मिळकत हँगिंग गार्डनसाठी आरक्षित असल्याने तेथील व्यावसायिकांचे या जागेत पुनर्वसन करण्यात आले होते. सन २०१७ च्या मान्य डी.पी. नकाशानुसार या ठिकाणी Municipal Purpose (MP 31) चे आरक्षण नमूद आहे.

तीन भाडेपट्टाधारक आणि त्यांचे प्लॉट्स

या जागेवर तीन भाडेपट्टाधारकांना ९९ वर्षांच्या भाडेकराराने प्लॉट्स देण्यात आले होते :

प्लॉट क्र. ८ : श्री. सैय्यद शेरअली सैय्यद मेहबूब — २२५ चौ.मी., प्रीमियम रु. १,२३,७५०, नाममात्र वार्षिक भाडे १ रुपया, कालावधी १६/०९/१९९५ ते १५/०९/२०९४
प्लॉट क्र. १० : श्री. सतीश शिवाजीराव पाटील — २२० चौ.मी., प्रीमियम रु. १,२१,०००, नाममात्र वार्षिक भाडे १ रुपया, कालावधी २२/०१/१९९६ ते २१/०१/२०९५
प्लॉट क्र. ९ : श्री. रवींद्र छोटूसिंग निवते — २२० चौ.मी., प्रीमियम रु. १,२१,०००, नाममात्र वार्षिक भाडे १ रुपया, कालावधी २३/११/१९९५ ते २२/११/२०९४

नोटिसा, सुनावणी आणि पुनर्वसनाचा निर्णय

सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ही जागा मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असल्याने, तिन्ही प्लॉट्सच्या मूळ भाडेपट्टाधारकांना (दोघा मूळ धारकांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्रीमती रतन सतीश पाटील यांना) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ८१(ब) अन्वये नोटीस देण्यात आली होती. नोटिसीनंतर प्लॉट क्र. ८, ९, १० धारकांनी लेखी म्हणणे मांडून नुकसान भरपाईची मागणी केली. त्यानंतर कलम ८१ ब, पोटकलम (२) अन्वये सुनावणीची नोटीस बजावण्यात आली.

सुनावणीदरम्यान उपआयुक्त, मालमत्ता विभाग यांनी प्लॉट क्र. ८ चे मूळ भाडेपट्टाधारक श्री. सैय्यद शेरअली सैय्यद मेहबूब आणि प्लॉट क्र. १० चे मूळ भाडेपट्टाधारक कै. सतीश शिवाजीराव पाटील (यांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्रीमती रतन पाटील) यांचे पुनर्वसन करण्याबाबत आयुक्तांच्या मान्यतेनुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आयुक्तांच्या ठराव क्र. ६/२९५ व ६/२९४ (दि. ०७/०८/२०२६) अन्वये यास मान्यता प्राप्त झाली आहे.

प्लॉट क्र. ९ चा करार रद्द, प्रीमियम जप्त

प्लॉट क्र. ९ चे मूळ भाडेपट्टाधारक रवींद्र छोटूसिंग निवते यांनी विनापरवानगी हस्तांतरण केल्याचे तसेच अनुज्ञेय वापरामध्ये बदल केल्याचे समोर आल्याने, भाडेकराराच्या अटी व शर्तींचा भंग झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे करारनाम्यात नमूद केल्यानुसार या प्लॉटच्या भाडेपट्टाधारकाची संपूर्ण प्रीमियम रक्कम जप्त करणे, करारनामा रद्द करणे व प्लॉटचा ताबा परत घेणे याला आयुक्तांच्या ठराव क्र. ६/४०९ (दि. ०४/०९/२०२६) अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

दुप्पट मोबदल्याचे धोरण आणि मूल्यांकन

पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या जागा शासकीय/निमशासकीय आस्थापनांना मालकी हक्काने हस्तांतरित करताना, मूळ संपादनावेळी मनपाने जमीनमालकांना क्षेत्राच्या दुप्पट मोबदला दिलेला असल्याने, मूल्यांकनाच्या दुप्पट रकमेचा मोबदला घेऊन जागा देण्याचे धोरण आहे. यापूर्वी पुणे रेल्वे स्टेशनवरील ताण कमी करण्यासाठी हडपसर रेल्वे स्टेशन विकसनासाठी मुंढवा स.नं. ६२/२,३,४ येथील ट्रान्सपोर्ट हब आरक्षित जागा रेल्वे विभागास दुप्पट दराने हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याच धोरणानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सन २०२६-२७ च्या शिघ्रसिद्धगणकानुसार खुल्या जागेचा दर प्रति चौ.मी. रु. २९,४४०/- गृहीत धरण्यात आला  आहे

 

समितीसमोर चार मागण्या

आयुक्तांनी शहर सुधारणा समितीमार्फत पुढील चार बाबींना मान्यता मागितली आहे :

१. जागेचे मूल्यांकन रु. १,९५,७७,६००/- असून, त्याच्या दुप्पट म्हणजेच रु. ३,९१,५५,२००/- पुणे महामेट्रोमार्फत पुणे महानगरपालिकेच्या आर्थिक दायित्वामध्ये समायोजित करणे.

२. अ‍ॅमिनिटी स्पेस कमिटी व बांधकाम विभागाची मान्यता मिळेल, या भरवशावर प्लॉट क्र. ८ चे मूळ भाडेपट्टाधारक श्री. सैय्यद शेरअली सैय्यद मेहबूब आणि प्लॉट क्र. १० चे मूळ भाडेपट्टाधारक कै. सतीश शिवाजीराव पाटील यांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्रीमती रतन सतीश पाटील यांचे कोंढवा बु. सर्व्हे क्र. २७/१अ व २७/२क या ठिकाणी अनुक्रमे २२५ चौ.मी. व २२० चौ.मी. क्षेत्रावर पुनर्वसन करणे.

३. प्लॉट क्र. ९ चे भाडेपट्टाधारक रवींद्र छोटूसिंग निवते यांनी विनापरवानगी हस्तांतरण व वापरात बदल केल्याने त्यांची संपूर्ण प्रीमियम रक्कम जप्त करणे, करारनामा रद्द करणे व प्लॉटचा ताबा परत घेणे.

४. पुणे पेठ धनकवडी स.नं. १९ अ/४ अ+ब येथील प्लॉट क्र. ८, ९, १० ही जागा मालकी हक्काने पुणे मेट्रो रेल प्रकल्पाला हस्तांतरित करणे.

 

हा प्रस्ताव आता शहर सुधारणा समितीसमोर चर्चेसाठी ठेवण्यात आला असून, या समितीच्या मान्यतेनंतर तो स्थायी समितीमार्फत अंतिम मान्यतेसाठी मुख्य सभेकडे पाठवण्यात येणार आहे. प्रस्तावास मान्यता मिळाल्यास स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गावरील पद्मावती स्टेशनच्या बांधकामासाठीचा जागेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0