Mahatma Gandhi Jayanti | श्रमप्रतिष्ठेचा सन्मान हेच महात्मा गांधींना खरे अभिवादन! | ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांचे प्रतिपादन
| राष्ट्रीय मजदूर संघातर्फे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान
Sunil Shinde RMS – (The Karbhari News Service) – सत्य, अहिंसा, समानता आणि श्रमप्रतिष्ठेचे विचार आपल्या जीवनात अंगीकारणे, हेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी केले. स्वच्छ भारताचा विचार महात्मा गांधी यांनी केवळ स्वच्छ रस्ते आणि परिसरापुरता मर्यादित ठेवला नव्हता, तर स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असा संदेशही त्यांनी दिला होता, असेही त्यांनी नमूद केले. (Pune News)
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीने गणेशोत्सव काळात स्वच्छता व्यवस्थेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पुणे पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उल्हासदादा पवार बोलत होते.
यावेळी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, आरोग्य निरीक्षक आणि मुकादम यांचा ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार आणि पुणे महानगरपालिकेचे सभासद व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याच्या श्रमाचा आणि योगदानाचा सन्मान होणे आवश्यक आहे. त्यांच्या कामाकडे केवळ नोकरी किंवा कर्तव्य म्हणून न पाहता, त्यांच्या श्रमाचे महत्त्व ओळखणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, असे मत राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे म्हणाले, “हा सन्मान केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून पुणे महानगरपालिकेतील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाचा आणि योगदानाचा सन्मान आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी सातत्याने मेहनत घेत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय मजदूर संघाने हा सन्मान सोहळा आयोजित केला, ही आनंदाची बाब आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या विचारांना अभिवादन करून आणि स्वच्छता व सन्मानाची शपथ घेऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन संघटक विशाल बागुल यांनी केले, तर संघटनेचे सेक्रेटरी एस. के. पळसे यांनी उपस्थित सर्व कामगार आणि मान्यवरांचे आभार मानले.
महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि श्रमप्रतिष्ठेच्या विचारांचा जागर करत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या श्रमाचा सन्मान करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

COMMENTS