PMC Karvenagar Road Project | राजाराम पुलाजवळचा भूसंपादन प्रस्ताव अंतिम टप्प्यात | ९० कोटींचा खर्च
| कर्वेनगर-वारजेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – सिंहगड रस्ता व कर्वेनगर यांना जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हा पूल सुरू झाल्यानंतर कर्वेनगर भागात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेलाही आता वेग आला आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी दिली असून, महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी ही प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
कर्वेनगर (शिवणे खराडी प्रकल्पांतर्गत) महालक्ष्मी लॉन्स ते दुधाणे लॉन्स जावळकर उद्यान दरम्यान ३६ मीटर डी.पी. रस्त्याचे, तसेच कर्वेनगर आंबेडकर चौक ते जावळकर उद्यान दरम्यान ३० मीटर डी.पी. रस्त्याचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेकडून चालू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ‘मिसिंग लिंक’ बाबतच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव डिसेंबरअखेर पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले होते.
त्या अनुषंगाने अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे नुकतीच पथ विभाग, भूसंपादन विभाग व मालमत्ता व्यवस्थापन विभागाची एकत्रित बैठक घेण्यात आली.
किती जमीन, किती खर्च?
या भूसंपादन प्रस्तावानुसार ३६ मीटर डी.पी. रस्त्यासाठी एकूण ७,६००.०० चौ.मी., तर ३० मीटर डी.पी. रस्त्यासाठी एकूण २,१००.०० चौ.मी. अशी एकूण ९,७००.०० चौ.मी. जागा रस्ता विकसनासाठी पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात येणार आहे. या भूसंपादनासाठी एकूण ९०.५० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून, त्यापैकी ३० टक्के म्हणजेच रु. २७.१४ कोटी इतकी रक्कम विशेष भूसंपादन अधिकारी क्र. १६, पुणे यांच्याकडे आधीच जमा करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पुढील आठवड्यात कलम १९ ची अधिसूचना जाहीर होऊन अंतिम निवाडा जाहीर करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
डिसेंबरपर्यंत जमीन ताब्यात येण्याची अपेक्षा
या भूसंपादनामधील जागा नोव्हेंबर मध्यापर्यंत महापालिकेच्या ताब्यात येणे अपेक्षित असून, त्यानंतर तेथे रस्ता विकसनाचे काम सुरू करणे शक्य होणार आहे. यामुळे सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगर व वारजे भागामध्ये जाणाऱ्या नागरिकांना राजाराम पुलावरून लांबच्या मार्गाने जाण्याऐवजी जवळचा रस्ता उपलब्ध होणार आहे. तसेच हा पूल सुरू झाल्यानंतरही कर्वेनगर व वारजे भागातील वाहतूक कोंडी टाळता येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
या बैठकीस पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर, भूसंपादन व व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त निखिल मोरे तसेच मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त प्रशांत ठोंबरे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सिंहगड रस्ता व कर्वेनगर यांना जोडणारा पूल आणि त्यासोबत होणारे हे भूसंपादन एकत्रितपणे कर्वेनगर-वारजे परिसरातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. भूसंपादन प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास डिसेंबरअखेरपर्यंत रस्ता विकसनाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.

COMMENTS