Pune Fire Brigade Action on PG | नियम पाळा, नाहीतर जेलमध्ये जा! | पुण्यात अवैध PG, हॉस्टेल्स आणि क्लासेसच्या मालकांवर गुन्हे दाखल होणार!
Pune PMC Action – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे अग्निशमन दलाने शहरातील बेकायदेशीर आणि विनापरवाना पीजी (Paying Guest), हॉस्टेल्स तसेच कोचिंग क्लासेसवर धडक कारवाई सुरू केली आहे. लोहगाव, शिवाजीनगर आणि नवी पेठ भागात करण्यात आलेल्या या विशेष तपासणी मोहिमेमुळे अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (PMC Fire Department)
अग्निशमन दलाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम लोहगाव परिसरातील पीजी आणि हॉस्टेल्सची आग प्रतिबंधक दृष्टीने तपासणी करण्यात आली. यामध्ये अनेक आस्थापना अनधिकृत आणि कोणतीही परवानगी न घेता सुरू असल्याचे समोर आले. अशा सर्व नियमबाह्य पीजी व हॉस्टेल्सना पुढील ७ दिवसांत नियमांचे पालन करून त्रुटींची पूर्तता करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.
या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून आज शिवाजीनगर, नवी पेठ आणि लोहगाव भागातील एकूण ३६ आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये २१ पीजी व हॉस्टेल्स, १३ कोचिंग क्लासेस, १ अभ्याशिका (Study Room) आणि १ फिटनेस जिमचा समावेश होता.
तपासणी दरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, यातील बहुतांश ठिकाणी सुरक्षिततेच्या नियमांचे अजिबात पालन केले जात नव्हते. इतकेच नव्हे तर हॉस्टेल आणि पीजी चालवण्यासाठी आवश्यक असणारी बिल्डिंग परमिशन, ड्रेनेज, पाणीपुरवठा, वृक्ष प्राधिकरण, स्ट्रक्चरल ऑडिट, कर विभाग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अग्नशमन दलाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) यांपैकी कोणतीही अधिकृत परवानगी या चालकांकडे आढळून आली नाही.
विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; क्लासेस सील होणार?
कोचिंग क्लासेस आणि अभ्यासिकेमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मात्र, तपासणी केलेल्या अनेक क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारे दोन दरवाजे, आपत्कालीन निकास मार्ग (Exit Gate), अग्निरोधक उपकरणे, प्रशस्त जिने, मोकळा पॅसेज तसेच स्थायी व तात्पुरती अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे. या गंभीर त्रुटींमुळे “तुमच्या आस्थापना तात्काळ सील का करण्यात येऊ नयेत?” अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस अग्निशमन दलाने बजावली आहे.
नियम न पाळल्यास थेट गुन्हे दाखल होणार!
महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. “ज्या क्लासेस, शाळा, रुग्णालये किंवा इतर आस्थापनांनी अग्निसुरक्षा विषयक नियमांची पूर्तता केली नाही, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्या संस्था तत्काळ बंद केल्या जातील. तसेच संबंधित बेकायदेशीर पीजी आणि क्लासेसच्या मालकांवर थेट गुन्हे (FIR) दाखल करण्यात येतील,” असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS