PMC Health Department | खराडी व वारजे माळवाडीत बोगस डॉक्टरांचा भांडाफोड! | पुणे महापालिकेच्या कारवाईनंतर दोन ठिकाणी गुन्हे दाखल

Homeadministrative

PMC Health Department | खराडी व वारजे माळवाडीत बोगस डॉक्टरांचा भांडाफोड! | पुणे महापालिकेच्या कारवाईनंतर दोन ठिकाणी गुन्हे दाखल

Ganesh Kumar Mule Sep 11, 2026 6:53 PM

ChatBot | महापालिकेशी संबंधित माहिती सहजपणे नागरिकांना उपलब्ध करून देणेकरीता महापालिका ChatBot प्रणाली वापरणार 
PMRDA | पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकामप्रकरणी नोंदवला गुन्हा
PMC Ward 23 – Ravivar Peth Nana Peth | प्रभाग क्रमांक – २३ – रविवार पेठ- नाना पेठ| प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या 

PMC Health Department | खराडी व वारजे माळवाडीत बोगस डॉक्टरांचा भांडाफोड! | पुणे महापालिकेच्या कारवाईनंतर दोन ठिकाणी गुन्हे दाखल

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – शहरात विनापरवाना व बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात पुणे महानगरपालिकेने कठोर पावले उचलली असून, खराडी आणि वारजे माळवाडी येथील दोन स्वतंत्र प्रकरणांत पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation Health Department)

बोगस डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे अनेक रुग्णांच्या शरीरावर विपरीत परिणाम होणे, काहींना कायमचे अपंगत्व येणे, तर काही प्रकरणांत रुग्णांचा जीवही गमावला जाणे, अशा गंभीर तक्रारी राज्य शासनाकडे प्राप्त होत असल्याने, राज्य बोगस डॉक्टरमुक्त करण्याच्या उद्देशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिका स्तरावर ‘बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समिती’ स्थापन करण्यात आली होती.

प्रकरण १ : खराडीतील ‘श्री विघ्नहर्ता पॉलीक्लिनिक’

खराडी येथील तक्रारीनुसार, ‘श्री विघ्नहर्ता पॉलीक्लिनिक’ येथे अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका कथित डॉक्टरविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ उजनकर यांनी याबाबत फिर्याद दिली असून, त्यांना सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी मार्गदर्शन केले.

तपासणीत असे निष्पन्न झाले की, आरोपी धीरज दिलीप येवले (वय २९ वर्षे, मूळ रा. चाळीसगाव, जळगाव) हा प्लॅटिनम टॉवर, शॉप नं. ०७-अ, तळमजला, जुना मुंढवा रोड, खराडी येथील ‘श्री विघ्नहर्ता पॉलीक्लिनिक’मध्ये जुलै २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत कोणताही वैध वैद्यकीय परवाना अथवा नोंदणी नसताना वैद्यकीय व्यवसाय करत होता. यासोबतच, आरोपीने कस्तुरबा स्पेशालिटी हॉस्पिटल, विश्रांतवाडी येथील अन्य नोंदणीकृत महिला आयुर्वेदिक डॉक्टरांच्या नावाचा नोंदणी क्रमांक व नोंदणी तपशील खोट्या पद्धतीने सादर करून नोकरी मिळवली आणि रुग्णालय प्रशासन, वैद्यकीय परिषद तसेच रुग्णांची फसवणूक केल्याचेही तपासात उघड झाले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम ३१८(२) (फसवणूक) तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्ट, १९६१ चे कलम ३३(२) व ३६ अन्वये अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण प्रकाश नरवडे हे करत आहेत.

प्रकरण २ : वारजे माळवाडीतील ‘गुरुकृपा क्लिनिक’

वारजे माळवाडी येथून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या बोगस डॉक्टर शोध विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे व आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी विनापरवाना व अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या एका कथित डॉक्टरवर कारवाईसाठी आदेश निर्गमित केले. महापालिकेचे वारजे कर्वेनगर येथील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश डमाळे यांच्या तक्रारीवरून आरोपी उद्धव चव्हाण याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वारजे माळवाडी येथील ‘गुरुकृपा क्लिनिक’ येथे डॉ. गणेश डमाळे व अन्न निरीक्षक अजित भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, आरोपीकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही शैक्षणिक अर्हता, पदवी किंवा वैद्यकीय परिषदेची नोंदणी नसताना तो नागरिकांना अ‍ॅलोपॅथीचे उपचार देत असल्याचे निष्पन्न झाले. क्लिनिकच्या पाहणीदरम्यान वेगवेगळ्या डॉक्टरांच्या नावाचे शिक्के, प्रिस्क्रिप्शन बुक्स, औषध खरेदीच्या पावत्या आढळल्या, तसेच बायो-मेडिकल वेस्ट (जैव-वैद्यकीय कचरा) नोंदणी केली नसल्याचेही निदर्शनास आले. क्लिनिकमध्ये साठवलेली विविध औषधे पंचनामा करून सील करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांनाही पुढील कारवाईसाठी सूचित करण्यात आले आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९६१ चे कलम ३३(१), ३३(२), ३६(१), ३६(२) अन्वये अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर सुरेश पाटील हे करत आहेत.

महापालिकेची मोहीम सुरूच राहणार

या दोन्ही कारवायांमुळे शहरातील बोगस डॉक्टरांविरोधातील मोहिमेला वेग आल्याचे स्पष्ट झाले असून, नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर पोलिसांच्या सहकार्याने कठोर कारवाई करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0