PMC Ward Committee | प्रभाग समित्यांवर नियुक्तीसाठी 260 जण इच्छुक | हडपसरमध्ये सर्वाधिक अर्ज
PMC Election Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांवर बिन सरकारी आणि समाजलक्षी संघटनांच्या प्रतिनिधींच्या नियुक्तीसाठी तब्बल 260 अर्ज प्राप्त झाले आहेत. 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर ही प्रक्रिया राबविण्यात आली असून हडपसर मांजरी आणि विश्रामबागवाडा येथे सर्वाधिक अर्ज आले आहेत. प्राप्त अर्जांची छाननी 15 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करून पात्र उमेदवारांची यादी सादर करण्याचे आदेश निवडणूक विभागाचे उप आयुक्त प्रसाद काटकर यांनी दिले आहेत. (Prasad Katkar PMC)
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर मनपा हद्दीचे 41 प्रभागांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. हे 41 प्रभाग 15 क्षेत्रीय कार्यालयांना संलग्न करण्यात आले असून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय निहाय प्रभाग समिती स्थापन करण्यात आली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 29 अ मधील तरतुदीनुसार प्रत्येक प्रभाग समितीमध्ये स्वयंसेवी संस्था आणि समाजलक्षी संघटनांच्या सदस्यांमधून कमाल 3 सदस्यांची नामनिर्देशित पद्धतीने नेमणूक करायची आहे.
त्यासाठी मनपा निवडणूक कार्यालयाकडून 12 ऑगस्ट 2026 रोजी दैनिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले होते. या प्रकटनानुसार 18 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले.
या कालावधीत एकूण 260 अर्ज दाखल झाले आहेत.
क्षेत्रीय कार्यालय निहाय आकडेवारी अशी आहे.
विश्रामबागवाडा 27, येरवडा 22, हडपसर मांजरी 28, कोंढवा 22, वानवडी 9, धनकवडी 25, औंध 19, घोले रोड 17, वारजे कर्वेनगर 26, कसबा पेठ 11, नगर रोड 21, बिबवेवाडी 16 आणि कोथरूड बावधन 17. ढोले पाटील आणि सिंहगड रोड या दोन क्षेत्रीय कार्यालयांची आकडेवारी अद्याप संकलित करण्यात येत आहे.
या सर्व 260 अर्जांची छाननी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करावी, पात्र उमेदवारांचे अर्ज अभिप्रायासह संबंधित प्रभाग समितीकडे सादर करावेत आणि त्याचा अहवाल निवडणूक कार्यालयाकडे पाठवावा, अशा सूचना उप आयुक्त प्रसाद काटकर यांनी सर्व परिमंडळ 1 ते 5 चे उपायुक्त आणि सर्व 15 क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त यांना दिल्या आहेत.

COMMENTS