Pramod Nana Bhangire | धर्मराज जयस्वाल यांच्या कुटुंबीयांना तात्काळ पाच लाखांची सानुग्रह मदत द्या – प्रमोद नाना भानगिरे यांची महापालिकेकडे मागणी 

Homeadministrative

Pramod Nana Bhangire | धर्मराज जयस्वाल यांच्या कुटुंबीयांना तात्काळ पाच लाखांची सानुग्रह मदत द्या – प्रमोद नाना भानगिरे यांची महापालिकेकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Sep 02, 2026 1:36 PM

Dhamma Sandhya | येरवड्यातील लुंबिनी उद्यानात भीमगीतांची ‘धम्म संध्या’ उत्साहात संपन्न – बुद्ध जयंतीनिमित्त माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी धेंडे यांच्या वतीने आयोजन
contract workers in the crematorium | स्मशानभूमी मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत महापालिकेत बैठक
PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेत आणखी दोन उपायुक्त प्रतीनियुक्तीने!

Pramod Nana Bhangire | धर्मराज जयस्वाल यांच्या कुटुंबीयांना तात्काळ पाच लाखांची सानुग्रह मदत द्या – प्रमोद नाना भानगिरे यांची महापालिकेकडे मागणी

हडपसरमध्ये महापालिकेच्या कचरा डंपरने घेतला तरुणाचा बळी

 

Pune Hadapsar News – (The Karbhari News Service) – हडपसरमधील अपघातात मृत्यू झालेल्या धर्मराज जयस्वाल यांच्या कुटुंबीयांना पुणे महानगरपालिकेने तात्काळ पाच लाख रुपयांची सानुग्रह मदत देऊन ती रक्कम कुटुंबीयांच्या स्वाधीन करावी, अशी मागणी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे. महापालिकेच्या कचरा डंपरच्या धडकेत धर्मराज जयस्वाल या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सर्वे नंबर ५७, जीएसपीएम महाविद्यालयाच्या मागे, बाबाजी मंदिराशेजारी, आदर्शनगर, हांडेवाडी रस्ता, उरुळी देवाची येथे घडला. प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, एका तरुणाचा अशा पद्धतीने मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर बाब आहे. धर्मराज जयस्वाल यांच्या कुटुंबाचा आधार, त्यांच्या आशा-अपेक्षा आणि भविष्यातील स्वप्ने या अपघाताने उद्ध्वस्त झाली असून, महापालिकेने संवेदनशीलता दाखवत कोणताही विलंब न करता पाच लाखांची सानुग्रह मदत द्यावी. (Pune PMC News)

महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करण्याची वेळ आता आली आहे. कचरा डंपर भरधाव वेगाने चालविणे, निर्धारित वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करणे, मार्गिकेचे नियम न पाळणे आणि पादचारी व दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे, अशा प्रकारांवर कठोर नियंत्रण असणे आवश्यक आहे. अवजड वाहनांचा आकार, वजन, ब्रेक लागण्यासाठी लागणारे अधिक अंतर आणि चालकाच्या मर्यादित दृश्य क्षेत्राचा विचार करता अशा वाहनांसाठी विशेष सुरक्षा नियमांची सक्तीने अंमलबजावणी झाली पाहिजे.

प्रत्येक कचरा वाहतूक वाहनाचे जीपीएसच्या माध्यमातून नियमित निरीक्षण, वेगाची नोंद व नियंत्रण, वाहनाची तांत्रिक तंदुरुस्ती, ब्रेक, टायर, दिवे आणि इतर सुरक्षा यंत्रणांची नियमित तपासणी करणे बंधनकारक करण्यात यावे. वाहनचालकाचा परवाना, अनुभव, प्रशिक्षण तसेच वैद्यकीय आणि दृष्टी तपासणीची खातरजमा करूनच त्याला अवजड वाहन चालविण्याची परवानगी द्यावी. वाहनांच्या मार्गाचे आणि वेळेचे नियमन करून नियमित सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात यावे. या अपघाताची निष्पक्ष चौकशी करून चालकासोबतच संबंधित कंत्राटदाराचीही जबाबदारी निश्चित करावी. निष्काळजीपणा किंवा नियमभंग आढळल्यास चालक आणि कंत्राटदारावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

पुणे महानगरपालिकेने कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांसाठी स्वतंत्र आणि अधिक कठोर नियमावली लागू करावी. निश्चित वेगमर्यादा, जीपीएस निरीक्षण, चालकांचे अनिवार्य प्रशिक्षण, वाहनांची नियमित तांत्रिक तपासणी, मार्ग व वेळेचे नियमन आणि सुरक्षा लेखापरीक्षण या बाबी सक्तीच्या कराव्यात. गंभीर किंवा वारंवार नियमभंग करणाऱ्या कंत्राटदाराचा करार रद्द करण्याची तरतूद करावी. कचरा वाहतूक करण्याचे कंत्राट म्हणजे नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचा परवाना नाही. नागरिकांच्या जीविताची जबाबदारी महापालिका प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. धर्मराज जयस्वाल यांच्या कुटुंबीयांना तात्काळ पाच लाखांची सानुग्रह मदत देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी; अन्यथा नागरिकांचे जीव घेण्यासाठी कंत्राटदारांना कंत्राट दिले आहे का, असा सवाल उपस्थित होईल. यानंतरही महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही प्रमोद नाना भानगिरे यांनी स्पष्ट केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: