Pune Potholes | रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू; माजी नगरसेवकांचा पथ विभागाच्या कार्यपद्धतीवर सवाल

Homeadministrative

Pune Potholes | रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू; माजी नगरसेवकांचा पथ विभागाच्या कार्यपद्धतीवर सवाल

Ganesh Kumar Mule Aug 19, 2026 8:26 PM

Khadakwasla Dam Chain | खडकवासला  धरण साखळीत १६ TMC पाणी | चार धरणे  ५५ टक्के भरली  | खडकवासला धरणातून आतापर्यंत १.५१ टीएमसी विसर्ग 
Malegaon Incident | तीन वर्षीय यज्ञा दुसाने मालेगाव अमानुष अत्याचाराची बळी | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे घटनेचा तीव्र निषेध
 PMC Additional Commissioner | घनकचरा व्यवस्थापन, सामान्य प्रशासन विभाग अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) यांच्या नियंत्रणात तर बांधकाम विभाग अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांच्या नियंत्रणात तर मिळकत कर विभाग अतिरिक्त आयुक्त विशेष यांच्याकडे | विशेष यांच्या नियंत्रणात २३ खाती 

Pune Potholes | रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू; माजी नगरसेवकांचा पथविभागाच्या कार्यपद्धतीवर सवाल

हॉट मिक्स प्लांट आणि यंत्रसामग्री असतानाही काम का झाले नाही, आयुक्तांना पत्र

 

PMC Road Department – (The Karbhari News Service) – शहरातील रस्त्यावरील खड्ड्यात पडून एका लहानग्याचा मृत्यू झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या पथविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना  पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पथविभागाकडे सर्व साधनसामग्री असतानाही काम नाही
पत्रात म्हटले आहे की, कंत्राटदारांना कामे देण्याऐवजी मनपाच्या पथविभागाकडेच रस्त्यांची कामे करता येऊ शकतात. पथविभागाकडे स्वतःचा हॉट मिक्स प्लांट, पेवर, रोलर, व्हायब्रेटर्स, 15 कोठे, स्वतःच्या गाड्या आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. सर्व काही असतानाही खड्डे बुजवण्याचे काम झाले नाही.

“जर ठरवले असते तर एकही खड्डा पुण्यामध्ये दिसला नसता. दुर्दैवाने कोणाचेही लक्ष नाही. अधिकारी फक्त टेंडर काढण्यात गर्क आहेत,” असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

आयुक्तांना विचारले 6 प्रश्न
खड्ड्यांच्या समस्येनंतर पथविभागाने नेमके काय केले, याबत माजी नगरसेवकांनी 6 मुद्दे उपस्थित केले आहेत.

1. गेल्या तीन महिन्यांमध्ये पथविभागाच्या हॉट मिक्स प्लांटमधून किती डांबराचे उत्पादन झाले.
2. त्या डांबराचा पुरवठा कोणत्या कोणत्या क्षेत्रीय कार्यालयाला करण्यात आला.
3. पेवर, रोलर आणि व्हायब्रेटर्स यांचा गेल्या तीन महिन्यात किती वापर झाला.
4. कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांनी खड्डे बुजवण्यासाठी काय प्रयत्न केले.
5. खाते प्रमुखाने यासंदर्भात केलेल्या कामांचा लेखाजोखा जाहीर करावा.
6. टेंडर काढण्याऐवजी पथविभागामार्फतच कामे का केली जात नाहीत.

हॉट मिक्स प्लांटला भेट देण्याची मागणी
“मी नगरसेवक असताना खात्यामार्फत केलेले रस्ते वीस वर्षांनंतरही चांगले आहेत,” असे म्हणत केसकर यांनी आयुक्तांनी तातडीने हॉट मिक्स प्लांटला भेट देऊन सर्व रजिस्टर आणि मेमो तपासावेत, अशी विनंती केली आहे. काही अधिकारी केवळ डिझेल भरण्यासाठी प्लांटवर खाजगी गाड्या घेऊन जातात, असाही आरोप त्यांनी केला आहे.

“एका लहानग्याचा मृत्यू क्लेशकारक आहे. त्यापेक्षाही सर्व सोयी उपलब्ध असताना काम न करण्याची प्रवृत्ती अधिक क्लेशदायक आहे. एका मुलाचे जीवन वाचवू शकलो असतो,” असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

क्षेत्रीय कार्यालयांवर ढकलाढकल करू नये
सध्या पथविभाग जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांवर ढकलून स्वतः नामानिराळे राहू पाहत आहे, हे चुकीचे आहे, असेही पत्रात म्हटले आहे. पुढील काळात किती टेंडर काढायची याचा निर्णय आयुक्तांनी घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे पत्र केंद्रीय राज्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री, नगरविकास राज्यमंत्री, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, अतिरिक्त आयुक्त तसेच पथ विभागाचे प्रभारी मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांनाही पाठवण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: