Devendra Wadke PMC | पुणे मनपाच्या भाडेतत्त्वावरील मालमत्तांवर कोट्यवधींची थकबाकी | नगरसेवक देवेंद्र वडके यांच्या प्रश्नावरून खुलासा
| सदनिका, भवन, भूमी आणि वाहनतळांचे भाडे न भरल्याने 35 कोटींपेक्षा जास्त रक्कम थकीत
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिका, भवन, भूमी, वाहनतळ आणि जलतरण तलावांपोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नगरसेवक देवेंद्र वडके यांनी याबाबत लेखी प्रश्न उपस्थित केला असता प्रशासनाने दिलेल्या उत्तरात ही आकडेवारी उघड झाली आहे.
सदनिका, भवन आणि भूमीपोटी 33 कोटींपेक्षा जास्त थकीत
मनपाने भाडेतत्त्वावर दिलेल्या मिळकतींचा आढावा घेतला असता मोठ्या प्रमाणात भाडे थकलेले असल्याचे दिसून आले.
एकूण 1133 सदनिकांपैकी 111 सदनिकांचे 6 कोटी 51 लाख 27 हजार 52 रुपये भाडे थकीत आहे.
263 भवनांपैकी 113 भवनांचे 3 कोटी 13 लाख 10 हजार 454 रुपये थकीत आहेत.
1152 भूमीपैकी 1213 भूमींचे सर्वात जास्त 24 कोटी 99 लाख 10 हजार 966 रुपये भाडे थकले आहे.
अशा प्रकारे केवळ सदनिका, भवन आणि भूमी मिळून 33 कोटी 63 लाख 48 हजार 472 रुपयांची थकबाकी मनपाकडे आहे.
12 वाहनतळांचे एक महिन्यापेक्षा जास्त भाडे थकीत
मनपाच्या हद्दीत एकूण 31 वाहनतळ आहेत. त्यापैकी 27 वाहनतळे सध्या कार्यरत आहेत तर 4 बंद आहेत. यापैकी 12 वाहनतळांचे एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीचे भाडे थकले असून त्याची एकूण रक्कम 86 लाख 70 हजार 699 रुपये आहे.
यात तुकाराम शिंदे वाहनतळातील 2 व्हीलरचे 33 लाख 38 हजार 506 रुपये आणि 4 व्हीलरचे 56 लाख 55 हजार 490 रुपये थकीत आहेत. तसेच हमालवाडा येथील वाहनतळाचे 9 लाख 66 हजार 184 रुपये भाडे थकले आहे.
जलतरण तलावांकडे कोट्यवधी रुपयांची भाडे थकबाकी
शहरातील 35 जलतरण तलावांपैकी 24 तलाव चालू असून 10 बंद आहेत. यापैकी 9 तलावांकडे जवळपास कोट्यवधी रुपयांची भाडे थकबाकी आहे.
यामध्ये नानासाहेब परळेकर जलतरण तलावाकडे 20 लाख 99 हजार 889 रुपये आणि कै. विष्णू उर्फ आप्पासाहेब जगताप जलतरण तलावाकडे 36 लाख 2 हजार 309 रुपये अशी सर्वात जास्त थकबाकी आहे.
मालमत्ता व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही थकबाकी वसूल करण्यासाठी नोटीस बजावणे, करार रद्द करण्याची प्रक्रिया आणि कायदेशीर कारवाई यांसारखे पर्याय वापरले जाणार आहेत. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी जमा झाल्याने मनपाच्या उत्पन्नावरही परिणाम होत असल्याचे दिसून येते.
नगरसेवक देवेंद्र वडके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे मनपाच्या विविध भाडेतत्त्वावरील मिळकतींमधील आर्थिक अनियमितता उघड झाली आहे. आता प्रशासन या थकबाकीदारांवर कोणती कठोर कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

COMMENTS