PMC Food Testing Machine | पुणे महापालिकेचे ‘फूड टेस्टिंग मशीन’ गायब
शोधानंतर आज सकाळी सापडले
2016-17 मध्ये 10 लाखांना खरेदी केलेले मशीन आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे बंद
PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे असले फूड टेस्टिंग मशीन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांची दर्जा तपासणी आणि अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी वापरले जाणारे हे 10 लाख रुपये किमतीचे मशीन आज सकाळी शोधल्यानंतर सापडले असल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली. (Mahesh Wable BJP)
भाजप नगरसेवक महेश नानासाहेब बाबळे यांनी याबाबत केलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.
-: हे ‘Fiweg Raw fiber extraction system’ कंपनीचे फूड टेस्टिंग मशीन सन 2016-17 मध्ये 9,98, 000/- रुपयांना खरेदी करण्यात आले होते. मशीन फूड हायजिन अँड हेल्थ लॅबोरेटरी या प्रयोगशाळेस वापरण्यास देण्यात आले होते. प्रयोगशाळेचा करार संपुष्टात आल्यानंतर सर्व उपकरणांची ताबे यादी करून ती 1/02/2018 रोजी सुपूर्द करण्यात आली होती.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत ताबे यादी आणि प्रत्यक्ष प्रयोगशाळेत पाहणी केली असता सदर मशीन आढळून आले नाही. त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनकडे मशीनबाबत तक्रार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मात्र आज सकाळी ते मशीन सापडले असून पुन्हा त्याचा वापर सुरू केला जाईल, असे डॉ. देवकर यांनी सांगितले.
दरम्यान महापालिकेकडे असे दोन मशीन होते. मशीन चालत नव्हते तेव्हा ते कत्तलखान्यात ठेवण्यात आले होते, अशी देखील माहिती समोर येत आहे.
याच उत्तरात असेही म्हटले आहे की, मशीनचा एक भाग असलेले ‘स्टॉडर’ हे एक वर्षाच्या कालावधीसाठीच मुदत असते. मात्र प्रयोगशाळा 2016 ते 2022 या कालावधीत प्रशासकीय कारणाने बंद असल्याने स्टॉडर नष्ट करण्यात आले आहेत.
राज्यात अन्नातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे मोठ्या प्रमाणात धाडी आणि कारवाया करत आहेत. त्याचवेळी पुणे महापालिकेकडे स्वतःचे फूड टेस्टिंग मशीन असूनही त्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे.
2018 पासून प्रयोगशाळा बंद असल्याने कोट्यवधींचे मशीन धूळ खात पडले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या महत्वाच्या यंत्रणेकडे प्रशासन किती गंभीर आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आता मशीन सापडल्यानंतर त्याचा वापर पुन्हा सुरू करून पुण्यातील हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रेते आणि शाळांमधील अन्नाची नियमित तपासणी केली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

COMMENTS