PMC Standing Committee | पुणे महापालिकेत २२ जुलैपासून “स्वच्छता अभियान सप्ताह” राबविण्याचा ठराव सादर | स्थायी समिती सदस्य सुहास टिंगरे व अमोल बालवडकर यांचा पुढाकार
Ajit Pawar Jayanti – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र शासनाने स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती २२ जुलै रोजी राज्यभर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांच्या स्वच्छता, शिस्त, टापटीप आणि प्रभावी प्रशासनाच्या कार्यशैलीला अभिवादन करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये सदस्य सुहास टिंगरे व सदस्य अमोल बालवडकर यांनी संयुक्तपणे “स्वच्छता अभियान सप्ताह” राबविण्याचा ठराव आज सादर केला. (Pune PMC News)
स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात स्वच्छ, सुंदर, शिस्तबद्ध आणि नागरिकाभिमुख शहर व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या कार्याचा आदर्श जोपासत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत दि. २२ जुलैपासून विशेष “स्वच्छता अभियान सप्ताह” राबविण्यात यावा, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे.
या अभियानाअंतर्गत महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सार्वजनिक रस्ते, पदपथ, चौक, शाळा, उद्याने, सार्वजनिक शौचालये, नाले, कचरा संकलन केंद्रे तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. तसेच नागरिक, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना, गृहनिर्माण संस्था व विविध सामाजिक संघटनांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छता, कचरा वर्गीकरण, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याबाबत व्यापक जनजागृती करण्यात यावी, अशीही मागणी ठरावात करण्यात आली आहे.
स्थायी समिती सदस्य सुहास टिंगरे आणि अमोल बालवडकर यांनी सांगितले की, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना खरी आदरांजली म्हणजे त्यांच्या स्वच्छ, शिस्तबद्ध आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीचे कृतीतून अनुकरण करणे होय. या अभियानामुळे पुणे शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि नागरिकाभिमुख होण्यास निश्चितच हातभार लागेल.

COMMENTS