Pramod Nana Bhangire | भर पावसात झाडांना टँकरने पाणी घातल्याच्या घटनेनंतर आज पुन्हा शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर घणाघात!
चार दिवसांतच खचलेल्या रस्त्याचा व्हिडिओ करत निकृष्ट कामांवर संतप्त सवाल
Pune Shivsena – (The Karbhari News Service) – भर पावसात टँकरद्वारे झाडांना पाणी घालण्याचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर सर्व स्तरांतून टीका झाली होती. त्या घटनेची चर्चा सुरू असतानाच आज पुन्हा शिवसेनेने पुणे महानगरपालिकेवर घणाघात करत हडपसर परिसरातील जामले वस्ती, ताडीगुत्ता चौक, मुंढवा मुख्य रस्ता येथे अवघ्या चार दिवसांपूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण पूर्णपणे खचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी “निकृष्ट कामांचा जागतिक विक्रम करायचाच ठरवलाय का पुणे महानगरपालिकेने?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. (Pune News)
प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “काल भर पावसात झाडांना टँकरने पाणी घालण्याचा प्रकार समोर आला आणि आज चार दिवसांपूर्वी तयार झालेला पूर्णपणे रस्ता खचल्याचे वास्तव पुणेकरांसमोर आले आहे. या दोन घटना अपघाती नाहीत, तर पुणे महानगरपालिकेच्या नियोजनशून्य आणि निष्काळजी कारभाराचे प्रतीक आहेत. लाखो रुपयांचा खर्च करून करण्यात आलेली कामे चार दिवसही टिकत नसतील, तर त्या कामांच्या गुणवत्तेची आणि त्यामागील यंत्रणेची चौकशी होणे अत्यावश्यक आहे.”
शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित रस्त्याचा मोठा भाग खचल्याचे दिसत असून एवढेच नव्हे, तर संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करण्याऐवजी वरवर थोडे डांबर टाकून परिस्थिती झाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “नागरिकांचा जीव धोक्यात घालून केवळ कामाचा देखावा करण्याची ही पद्धत तातडीने थांबली पाहिजे. पुणेकरांच्या कराच्या पैशातून निकृष्ट दर्जाची कामे करून कोणाचे हित साधले जात आहे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे,” अशी मागणी भानगिरे यांनी केली.
शिवसेनेच्या मते, गेल्या काही दिवसांत पुणे महानगरपालिकेच्या कामकाजातील गंभीर त्रुटी सातत्याने समोर येत आहेत. भर पावसात झाडांना टँकरने पाणी घालण्याचा प्रकार असो किंवा चार दिवसांत खचलेले डांबरीकरण असो, या घटनांमुळे प्रशासनातील नियोजनाचा अभाव, कामाच्या गुणवत्तेबाबतची बेपर्वाई आणि जबाबदारीची कमतरता स्पष्ट होत आहे. अशा घटनांमुळे पुणेकरांच्या सुजाण शहराच्या प्रतिमेलाही तडा जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंत्राटदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे. “पुणेकरांच्या कराच्या पैशाची उधळपट्टी, निकृष्ट दर्जाची विकासकामे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी सुरू असलेला खेळ आता थांबवावाच लागेल. अन्यथा पुणेकरांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभारेल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

COMMENTS