Pune Bopodi Dargah News | बोपोडीतील १५० वर्ष जुन्या दर्ग्याच्या पाडकामावरून वाद | भाजप नगरसेवकांवर कारवाईची शरद पवार पक्षाची मागणी 

HomeBreaking News

Pune Bopodi Dargah News | बोपोडीतील १५० वर्ष जुन्या दर्ग्याच्या पाडकामावरून वाद | भाजप नगरसेवकांवर कारवाईची शरद पवार पक्षाची मागणी 

Ganesh Kumar Mule Jun 22, 2026 3:53 PM

PMC Additional Commissioner | महापालिका अधिकाऱ्यांमधून अतिरिक्त आयुक्त पदावर निवड करण्याच्या पात्रता निकषात बदल!
PMC Standing Committee  | आकांक्षा फाउंडेशनचा 101 कोटींचा प्रस्ताव थांबला |  शिक्षण समितीमार्फतच पुढे जाणार
Khadakwasla Dam Water | खडकवासला समूहात ४.१३ टीएमसी पाणी साठा | पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Pune Bopodi Dargah News | बोपोडीतील १५० वर्ष जुन्या दर्ग्याच्या पाडकामावरून वाद | भाजप नगरसेवकांवर कारवाईची शरद पवार पक्षाची मागणी

 

NCP SCP Pune – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोपोडी येथील ऐतिहासिक हजरत शमसुद्दीन दर्ग्याचे पुणे महानगरपालिकेने पाडकाम केल्याच्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, सभागृहात अपशब्द वापरणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शहराध्यक्ष श्रीकांत  पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून ही मागणी मांडली आहे. (PMC General Body)

निवेदनानुसार, हजरत शमसुद्दीन दर्गा दीडशे वर्षांपासून बोपोडीत होता आणि राज्य शासनाचा ‘अ’ वर्ग दर्जा त्याला प्राप्त होता. मेट्रो किंवा रस्ता रुंदीकरणासाठी दर्ग्यामुळे कोणतीही अडचण नसतानाही, कोणतेही कारण न देता आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता महापालिकेने पाडकाम केले, असा आरोप करण्यात आला आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला हा दर्गा असल्याने या कारवाईमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

मागील आठवड्यात झालेल्या पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोंढवा भागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेवक गफूर भाई पठाण यांनी दर्गा कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी अंगावर धावून जाऊन अपशब्द वापरल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
श्रीकांत पाटील यांनी म्हटले आहे की, महात्मा फुले, बाबा आढाव, भाई वैद्य, भाऊसाहेब शिरोळे, वि.भा. पाटील यांच्यासारख्यांनी या सभागृहातून शहराचे प्रश्न मांडले. मात्र ७५ वर्षांच्या इतिहासात अशी घटना कधीही घडली नव्हती. याच सभागृहातून अनेक नगरसेवक पुढे केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्याचेही त्यांनी नमूद केले.

बोपोडी परिसरातील पती-पत्नीने पुणे महापालिकेत महत्त्वाचे पद भूषवले असूनही विद्यमान लोकप्रतिनिधींनी सभेत या विषयावर एक शब्दही न बोलल्याची टीका करण्यात आली आहे. आजवर सभागृहात प्रत्येक घटनेवर नगरसेवक चर्चा करत असल्याचे पुणेकरांनी पाहिले आहे, मात्र बोपोडीतील नगरसेवक यावेळी गप्प राहिल्याचे निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या घटनेचा निषेध नोंदवत, गफूर भाई पठाण यांना अपशब्द वापरणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जेणेकरून भविष्यात सभागृहात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: