Pune Breaking News | कात्रज कोंढवा रस्ता – जागा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांकडून आता सक्तीने पोलीसांमार्फत ताबा!

Homeadministrative

Pune Breaking News | कात्रज कोंढवा रस्ता – जागा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांकडून आता सक्तीने पोलीसांमार्फत ताबा!

Ganesh Kumar Mule Jun 03, 2026 7:48 PM

PMC Pune | Mahavikas Aaghadi March | महाविकास आघाडी पुणे महापालिकेवर काढणार मोर्चा 
Pune Rain | पुण्यात कुठेही पाणी साचू नये याची दक्षता घ्या! | चंद्रकांतदादा पाटील यांचे महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश
PMC Pune Recruitment Second Phase | महापालिका भरती दुसरा टप्पा | दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी विधान भवनाचा अडसर! | रोस्टर तपासण्यात होतोय विलंब

Pune Breaking News | कात्रज कोंढवा रस्ता – जागा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांकडून आता सक्तीने पोलीसांमार्फत ताबा!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील सातारा रस्ता ते सोलापूर रस्ता यांना जोडणाऱ्या कात्रज कोंढवा रस्त्यावर अत्यंत गंभीर बनलेली वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे आणि धाडसी पाऊल उचलले आहे. या रस्त्यासाठी आवश्यक असणारी जागा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या किंवा नकार देणाऱ्या मालमत्ताधारकांवर आता सक्तीने पोलीसांमार्फत ताबा घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तसेच या जागांवरील असलेली अतिक्रमणे / अनधिकृत बांधकाम पुढील दोन दिवसांत हटविणेबाबत उप आयुक्त (अतिक्रमण) रमेश शेलार यांना निर्देश दिलेले आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Katraj Kondhwa Road Land Acquisition)

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेल्या कात्रज कोंढवा रस्तारुंदीकरण प्रकल्पाला थेट गती देण्याचा निर्णय घेऊन भूसंपादनासाठी मनपा निधीतून प्रथमच भरीव तरतूद  महापालिका आयुक्त यांनी केल्याने तसेच शासनाकडून काही निधी उपलब्ध झाल्याने सदरच्या भूसंपादनासाठी निवाडा जाहीर झाला. विशेष भूसंपादन अधिकारी क्र.१५ श्रीमती श्वेता दारुणकर यांचेकडून सदर निवाड्यानुसार रस्त्याखाली जाणाऱ्या जागांचा महापालिका भूसंपादन व मालमत्ता व्यवस्थापन विभागांकडे ताबा घेण्याची कार्यवाही गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. ती बहुतांशी पूर्ण झाली आहे. आज  अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष)  ओमप्रकाश दिवटे यांनी मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, विशेष भूसंपादन अधिकारी क्र.१५ श्रीमती श्वेता दारुणकर व अतिक्रमण प्रभारी श्री रमेश शेलार, मालमत्ता व्यवस्थापन, भूसंपादन व व्यवस्थापन या विभागांसह राजस सोसायटी चौकापासून ते पिसोळी हद्दीपर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून व रस्ता विकसनात येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करून संबंधित विभागांना काम त्वरित करणेबाबत निर्देश देण्यात आले.

ज्या जागा आधीच महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या सर्व कात्रज-कोंढवा रस्त्यावरील लहान-मोठी स्ट्रक्चर हटवली जाणार असल्याची स्पष्ट माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या धडक मोहिमेअंतर्गत रस्त्याच्या हद्दीत येणारी सर्व प्रकारची अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी महापालिकेचे विशेष पथक सक्रिय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ताब्यात आलेल्या सर्व मोकळ्या जागेवर रस्ता विकसनाचे काम दर्जेदार व गतीने करणेबाबत पथ विभाग प्रमुख यांना सूचना देण्यात आल्या. कात्रज कोंढवा रस्त्याच्या विकासनासाठी पथ विभाग, भूसंपादन विभाग, मालमत्ता व व्यवस्थापन विभाग या सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्यवाही करावयाची आहे. या कामात कुठल्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. असा इशारा अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) यांनी दिला आहे.

प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणाच्या कामाला आता मोठी गती मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार असून, नागरिकांचा रोजचा प्रवास अत्यंत सुलभ आणि गतिमान होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0