Pune News | ‘विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन सर्वे’चा व्हायरल व्हिडिओ फेक | अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिस कारवाईचा पुणे महापालिकेचा इशारा

Homeadministrative

Pune News | ‘विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन सर्वे’चा व्हायरल व्हिडिओ फेक | अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिस कारवाईचा पुणे महापालिकेचा इशारा

Ganesh Kumar Mule May 31, 2026 7:41 AM

Mohan Joshi Congress | सोनियाजी गांधी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्रितपणे कार्यक्रम | बचतगटाच्या ३५० महिलांचा सहभाग
Pune Breaking News – पुणे शहरातील शांततापूर्ण आंदोलनांवरील निर्बंध मागे घ्यावेत | लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाची मागणी
Mohan Joshi Vs Prakash Javdekar | पुण्याच्या सांस्कृतिक कोपर्‍यावर प्रकाश जावडेकरांनी का हातोडा मारला? | मोहन जोशी यांचा सवाल

Pune News | ‘विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन सर्वे’चा व्हायरल व्हिडिओ फेक | अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिस कारवाईचा पुणे महापालिकेचा इशारा

 

 

Pune Census News – (The Karbhari News Service) –  पुणे शहरात जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील ‘घरयादी व घरांची गणना’चे कामकाज दि. १६ मे  पासून सुरू झाले असून दि. १४ जून पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. हे संपूर्ण कामकाज डिजिटल पद्धतीने मोबाईलवरील ‘एचएलओ अॅप’द्वारे केले जात असून सोशल मीडियावर ‘विद्यार्थ्यांमार्फत ऑफलाइन जनगणना’ होत असल्याचा व्हायरल व्हिडिओ ‘फेक’ असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अशा अफवा पसरवून राष्ट्रीय काम करणाऱ्या प्रगणकांची बदनामी करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

१५ क्षेत्रीय कार्यालयांत १२ हजारांहून अधिक कर्मचारी

पुणे शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात १०,९०२ प्रगणक व १,८१७ पर्यवेक्षकांमार्फत गणनेचे कामकाज सुरू आहे. प्रत्येक प्रगणकाला सुमारे २०० घरे व ८०० लोकसंख्या असलेला प्रगणक गट नेमून दिला आहे. सर्व प्रगणक ‘एचएलओ अॅप’वर ऑनलाइन पद्धतीने घरांची माहिती नोंदवत आहेत.

‘१४० घरांचा सर्वे अॅपवर पूर्ण’ : प्रगणकाचे स्पष्टीकरण

सोशल मीडियावर सदाशिव पेठेत शालेय विद्यार्थिनींकडून ऑफलाइन जनगणना केली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, संबंधित प्रगणकाने याचा इन्कार केला आहे. “आम्ही पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने ‘एचएलओ अॅप’वर काम करत आहोत. माझ्याकडील १६४ घरांपैकी १४० घरांचा सर्वे अॅपवर पूर्ण झाला आहे,” असे प्रगणकाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांना आवाहन: ओळखपत्र तपासा, अफवांवर विश्वास नको

महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रगणक घरी आल्यावर त्यांचे ओळखपत्र तपासावे व जनगणनेची माहिती मोबाईल अॅपद्वारे स्वतःसमोरच नोंदवून घेण्यास सांगावे. “सदर सर्वेक्षण पूर्णतः ‘एचएलओ अॅप’वर डिजिटल पद्धतीने होत आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रगणकांना सहकार्य करावे,” असे प्रशासनाने म्हटले आहे.

माहिती गोपनीय, राष्ट्रनिर्माणासाठी महत्त्वाची

जनगणनेची माहिती पूर्णतः गोपनीय असून ती राष्ट्रनिर्माण व नवीन योजनांसाठी उपयुक्त ठरते. “देशाच्या आणि पुण्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाच्या आराखड्यासाठी या माहितीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे,” असे प्रशासनाने नमूद केले आहे.

अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार

सदाशिव पेठेत शालेय विद्यार्थिनींकडून जनगणनेचे काम सुरू असल्याचा फेक व्हिडिओ व्हायरल करून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या व राष्ट्रीय काम करणाऱ्या प्रगणकांची बदनामी करणाऱ्या प्रवृत्तींवर पोलिस कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

जनगणना हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम असून नागरिकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: