Pune Low Emission Zone | शिवाजीनगर परिसरात लो इमिशन झोन लवकरच राबवला जाणार
| शहरात पर्यावरणपूरक व शाश्वत वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचा प्रशासनाचा मानस
Pune News – (The karbhari News Service) – पुणे महानगरपालिका शहरात पर्यावरणपूरक व शाश्वत वाहतूक व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने आगामी ५ जून जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर परिसरात लो इमिशन झोन (LEZ)’ राबविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करीत आहे. या उपक्रमांतर्गत कमी प्रदूषण करणाऱ्या BS-VI व इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन, वाहतूक व्यवस्थापन सुधारणा तसेच वायू प्रदूषण नियंत्रणावर विशेष भर देण्यात येणार आहे. यासोबतच पार्किंग पॉलिसी, अर्बन मोबिलिटी सेल ची प्रभावी अंमलबजावणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण,तसेच पुणे ग्रँड सायकल टूर सारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक प्रवासाची सवय विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पुणे शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि वाहतूकसुलभ बनविण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. (Pune Breakig News)
जिल्हाधिकारी कार्यालयात यापूर्वी झालेल्या बैठकीत शहरातील पर्यावरणपूरक, वाहतूक सुलभ आणि नागरिक-केंद्रित वाहतूक व्यवस्थेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ८ महत्त्वपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने १४ मे रोजी पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये रस्ता विभागा संदर्भातील ८ मुद्द्यांच्या अंमलबजावणीचा आढावा, कात्रज–कोंढवा रस्त्याची सद्यस्थिती, पावसाळापूर्व तयारी व कामे तसेच सायकल टूर या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी पादचारी सुविधा, मेट्रो स्थानक परिसरातील (NMT) सुविधा, पार्किंग व्यवस्थापन, सायकल ट्रॅक सक्षमीकरण, सार्वजनिक वाहतूक सुधारणा व शालेय वाहतूक सुरक्षा या विषयांवर संबंधित विभागांकडून सादरीकरण करण्यात आले. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई, जलनिस्सारण व्यवस्था, रस्ते दुरुस्ती व आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता पावसकर, मुख्य अभियंता, रस्ता, विद्युत, उद्यान, उपायुक्त परिमंडळ व भूसंपादन, विविध कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिका आयुक्त यांनी संबंधित विभागांना कामांची प्रभावी समन्वयाने व वेळेत अंमलबजावणी करून नागरिकांना सुरक्षित, सुलभ व शाश्वत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.

COMMENTS