Pune PMC News | सखल भागांतील पाणी साचण्याच्या समस्यांवर युद्धपातळीवर उपाययोजना करा – सभागृह नेते गणेश बिडकर
| महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापनावर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
PMC House Leader Ganesh Bidkar – (The Karbhari News Service) – शहरात गेल्या काही काळामध्ये कमी कालावधीत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः उंच भागातून मोठ्या प्रमाणात वाहून येणारे पाणी सखल भागांमध्ये तुंबते, या पार्श्वभूमीवर सखल भागांतील आवश्यक कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात यावीत. पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना त्वरीत राबवाव्यात, अशी सूचना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी प्रशासनाला केली आहे. (Pune Rain)
आगामी पावसाळापूर्वी शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने हाती घेण्यात येत आहेत. सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीत बैठक पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन माधव जगताप, मलनिस्सारण विभागाचे मुख्य अधीक्षक अभियंता श्री. खानोरे, तसेच पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation – PMC)
सदर बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख नाले/कॅनॉल ‘A’ मधील एकूण १२० ठिकाणांपैकी NDMA अंतर्गत सुरू असलेली कामे वगळता इतर ठिकाणी पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. मलनिस्सारण विभागामार्फत अशा ठिकाणांची यादी व अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, त्यानुसार आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. याबाबत सदर उपाययोजना कमी खर्चात अधिक परिणामकारक असतील यावर विशेष भर देण्यात येत येणार आहे.
यावेळी शहरातील पॅचमधील लाकडी पूल ते पुणे स्टेशन या दरम्यानच्या नाल्यांमध्ये साचलेला गाळामुळे नाल्यांची वहन क्षमता कमी झालेली असून त्यामुळे पावसाळ्यात सखल भागात पाणी साचण्याच्या घटना होत आहेत. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांना Excavator व तत्सम यंत्रांच्या सहाय्याने नाल्यांची तातडीने सफाई करण्याच्या सूचना गणेश बिडकर यांनी केली आहे.
नाल्यांमध्ये झालेली अतिक्रमणे ही नाल्यांच्या सखल भागात पाणी साचण्याचे प्रमुख कारण असल्याने अतिक्रमण विभागामार्फत अशा ठिकाणी तातडीने कारवाई करून नाल्यांचा प्रवाह सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाला व पावसाळी लाईन साफसफाईच्या कामांची गती वाढविण्यासाठी अनुभवी व गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या कंत्राटदारांची निवड करून तातडीने सदर कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश बैठकीत ठरल्याप्रमाणे महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.
——–
“सखल भागांमध्ये पाणी साचण्याची समस्या गंभीर असून, नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी नालेसफाई, अडथळे दूर करणे आणि अतिक्रमणांवर कारवाई ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून पावसाळ्यापूर्वी ही कामे वेळेत पूर्ण करावीत,”
| गणेश बिडकर, सभागृह नेते

COMMENTS