Ganesh Bidkar on PMC Budget | पुणेकरांच्या अपेक्षांना न्याय देणारे अंदाजपत्रक | सभागृह नेते गणेश बिडकर
PMC Budget 2026-27 – (The Karbhari News Service) – स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रक २०२६-२७ वर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणेकरांच्या अपेक्षांना न्याय देणारे अंदाजपत्रक असे कौतुक बिडकर यांनी केले आहे. (Shrinath Bhimale PMC)
बिडकर म्हणाले, आज सादर झालेले पुणे महानगरपालिकेचे २०२६-२७ चे अंदाजपत्रक हे विकसित पुण्याच्या दिशेने भक्कम पाऊल आहे. दूरगामी, शाश्वत आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्वावर आधारित असलेले हे अंदाजपत्रक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील ‘ग्रोथ हब’ म्हणून पुण्याला सक्षम करणारे आहे.
महिलांच्या नावावरील मिळकतींना ५० टक्के कर सवलत हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देणारा असून, प्रत्येक कुटुंबासाठी दिलासादायक आहे. महसूलवाढीसाठी स्वतंत्र समिती, विशेष कक्ष आणि करसंकलनावर दिलेला भर महापालिकेची आर्थिक ताकद वाढवेल.
शिक्षण क्षेत्रात ७५ ‘रोल मॉडेल’ शाळा आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, तर क्रीडा क्षेत्रात ‘फिट पुणे, फिट इंडिया’ अंतर्गत क्रीडा नर्सरीसारखे उपक्रम भविष्यातील पिढी घडविणारे आहेत. मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन, रिव्हरफ्रंट प्रकल्प, गृहनिर्माण योजना आणि वाहतूक सुधारणा यामुळे पुणेकरांचे जीवनमान अधिक उंचावणार आहे.तसेच लोहगाव येथे उभारण्यात येणारा ‘भारत मंडपम’ प्रकल्प पुण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे अधिवेशन व प्रदर्शन केंद्र म्हणून ओळख मिळवून देणारा ठरेल.
हे अंदाजपत्रक पुणेकरांच्या अपेक्षांना न्याय देणारे असून, पुण्याला अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रगत शहर बनविण्याचा ठोस संकल्प यातून दिसून येतो. असेही बिडकर म्हणाले.

COMMENTS