Pramod Nana Bhangire |खराडीच्या धर्तीवर हडपसर परिसरातील विविध आगीच्या घटनांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत द्या | प्रमोद नाना भानगिरे यांची स्थायी समिती अध्यक्षांकडे मागणी
Pune Breaking News – (The Karbhari News Service) – खराडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये २३ एप्रिल २०२५ रोजी लागलेल्या भीषण आगीत सुमारे ९० झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या दुर्घटनेत एका रहिवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळीतग्रस्त ९० कुटुंबांना प्रत्येकी ११,००० रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला असून हा निर्णय निश्चितच आपत्तीग्रस्त नागरिकांप्रती असलेली सामाजिक संवेदनशीलता आणि मानवी मूल्ये अधोरेखित करणारा आहे. संकटाच्या काळात महानगरपालिकेने घेतलेला हा सकारात्मक निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून त्याबद्दल स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचे अभिनंदन आणि खूप आभार. त्याच धर्तीवर हडपसर परिसरातील विविध आगीच्या घटनांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत द्या, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याकडे केली आहे. (PMC Standing Committee)
भानगिरे यांनी स्थायी समिती अध्यक्ष यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, हडपसर परिसरातही मागील काही काळात विविध ठिकाणी आगीच्या घटना घडून स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या घटनांमध्ये अनेक कुटुंबांची घरे, घरगुती साहित्य, उपजीविकेची साधने तसेच जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने संबंधित कुटुंबांवर मोठे आर्थिक व मानसिक संकट ओढवले आहे. विशेषतः राममनोहर लोहिया गार्डन परिसरातील झोपडपट्टी भागात लागलेली आग, कृष्णानगर स्मशानभूमी परिसरातील गोदामाला लागलेली आग, मगरपट्टा परिसरातील झोपडी भागात सिलेंडर स्फोटामुळे लागलेली आग तसेच काळेपडळ येथील सोसायटीच्या पार्किंगमध्ये लागलेली आग या घटनांमुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झालेले आहे.
या सर्व घटनांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती आधीच मर्यादित असल्यामुळे त्यांना स्वतःच्या खर्चाने पुनर्वसन करणे अत्यंत कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये नैसर्गिक व अनैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीतून या बाधित नागरिकांना देखील आर्थिक मदत उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे.
खराडी येथील जळीतग्रस्तांना ज्या संवेदनशीलतेने आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्याच धर्तीवर हडपसर परिसरातील वरील आगीच्या घटनांमध्ये नुकसान झालेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना देखील योग्य ती आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी, यामुळे संकटग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल तसेच पुणे महानगरपालिकेची नागरिकांप्रती असलेली जबाबदारी व संवेदनशीलता अधिक दृढ होईल.
तरी आपण या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित प्रशासनास आवश्यक त्या सूचना देऊन बाधित कुटुंबांना लवकरात लवकर आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. असे भानगिरे यांनी म्हटले आहे.

COMMENTS