Pune Air Pollution | बांधकामातून निर्माण होणारे धुलिकण रोखण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी हवा गुणवत्ता तपासणी प्रणालीस सहकार्य करावे | महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन
| बांधकाम क्षेत्रातील वायू प्रदूषण नियंत्रण व उपाययोजना” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
Mayor Manjusha Nagpure – (The Karbhari News Service) – राज्यातील अनेक शहरांमध्ये पी.एम २.५ आणि पी. एम. १० या धुलीकणांमुळे वायू प्रदूषण वाढत असल्याने राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या निर्देशानुसार बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर-आधारित हवा गुणवत्ता तपासणीसाठी प्रणाली उभारणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी रोजी पुणे महानगरपालिकेमार्फत बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी हवा गुणवत्ता तपासणी प्रणाली बसविणेबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शहरातील हवा प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ नियंत्रण उपाययोजना राबवून नागरिकांच्या आरोग्य संरक्षणाच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Breaking News)
या अनुषंगाने आज दि “बांधकाम क्षेत्रातील वायू प्रदूषण नियंत्रण व उपाययोजना” या विषयावर पुणे महानगरपालिकेच्या शहर अभियंता, पर्यावरण विभाग, आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (WRI India) तसेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पाषाण, पुणे यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेस पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (इ), पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (ज), पवनीत कौर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, उपआयुक्त, पर्यावरण, किशोरी शिंदे, पर्यावरण संवर्धन अधिकारी गणेश सोनुने व सह सचिव, क्रेडाई पुणे, तेजराज पाटील, NAREDCO पुणे, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना, महानगरपालिकेचे सर्व अभियंता आदी उपस्थित होते.
महापौर यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात, हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य आवश्यक असलेचे अधोरेखित केले व आपण सर्व नागरिक व प्रशासन यांनी मिळून हवा प्रदूषण कमी करणेसाठी कटिबद्ध असलेचे सांगितले. नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे गरजेचे आहे असे सांगून या कार्यशाळेच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेने बांधकाम क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासाठी एक ठोस आणि दूरदर्शी पाऊल उचलले आहे. त्यानुसार बांधकामातून निर्माण होणारे धुलिकण रोखण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. सदर प्रणाली बांधकाम क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम असून हा उपक्रम राबविणारी पुणे महानगरपालिका ही पहिली महापालिका आहे. असे महापौर यांनी नमूद करून हवा गुणवत्ता तपासणी प्रणालीचे अनावरण केले.
महापालिका आयुक्त यांनी पुणे शहरात सध्या वेगाने शहरीकरण होत असून त्यामुळे बांधकाम प्रकल्पांमध्ये वाढ झाली असून त्यान्वये वायुप्रदूषण वाढत आहे. एआरएआय (ARAI,२०२२) च्या अहवालानुसार, बांधकाम क्षेत्र हे धूळ उत्सर्जनात प्रमुख योगदान देणारे क्षेत्र आहे. त्यामध्ये पीएम १० धूलिकणांची पातळी जवळपास २३% आहे. यानुसार बांधकामाच्या ठिकाणी धूळ नियंत्रित करणे अत्यावश्यक बाब असून पुण्यातील वायू प्रदूषण वाहतूक, बांधकाम उपक्रम आणि रस्त्यावरील धूळ यासह अनेक स्रोतांमधून येते. पुणे शहरातील वाढते वायूप्रदुषणावर नियंत्रित ठेवून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येणार असेल्याचे सांगून सर्व क्षेत्रातून सहकार्य देण्याचे नागरिकांना आवाहन केले.
सदर प्रणालीद्वारे प्राप्त होणारी वास्तविक माहिती ही पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना प्राप्त होऊन त्यामुळे सूक्ष्म व अतिसूक्ष्म धुलिकण (PM 10 व PM 2.5) असलेल्या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणांची तात्काळ सूचना प्राप्त होऊन त्या ठिकाणी तपासणीचे नियोजन करून प्रदूषणाच्या घटना नियंत्रित करणेकरिता उपाययोजना राबविण्यासाठी सूचना देण्यात येतील याकरिता पुणे महानगरपालिका व WRI India गेल्या दोन वर्षांपासून वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सहकार्याने काम करत आहेत.
मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (इ) यांनी सदर प्रणाली बाबत माहिती दिली. या प्रणालीतून सेन्सरद्वारे उपलब्ध होणारी माहिती पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या देखरेखीसाठी एकत्रित केली जाईल. शहराच्या हवेच्या गुणवत्तेचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला सतत आणि समन्वित प्रयत्नांची आवश्यकता आहे असे नमूद केले.
\ तेजराज पाटील, क्रेडाई यांनी पुणे महानगरपालिका राबवीत असलेल्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनेला पाठींबा व सहकार्य असेल याची ग्वाही दिली. तसेच श्री संजय देशपांडे, मराठी बांधकाम व्यवसायिक यांनी हवा प्रदूषण कमी करणेसाठी राबविलेल्या उपाययोजनांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे व मोठ्या तसेच लहान बांधकाम प्रकल्पांवरती देखील सदर हवा गुणवत्ता तपासणी प्रणाली बसविण्यात यावी असे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपआयुक्त, पर्यावरण यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

COMMENTS