Zero Waste Kasba | कसबा मतदार संघात झिरो वेस्ट प्रायोगिक प्रकल्प | तीन महिने राबवला जाणार प्रकल्प | १००% कचरा संकलन करण्याचे नियोजन
PMC Solid Waste Management Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका कसबा मतदार संघ अंतर्गत कसबा विश्रामबागवाडा व भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयांच्या कार्यकक्षेत पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभाग व स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था यांचे संयुक्त विद्यमाने “झिरो वेस्ट कसबा विश्रामबागवाडा विधानसभा मतदार संघ ( कसबा पेठ व भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय ) ” हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी राबविण्यात येणार आहे. स्वच्छता पेठ अर्थात झिरो वेस्ट कसबा-भवानी या प्रकल्पाचे उद्घाटन आज कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासणे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), पवनीत कौर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ व सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. (PUne PMC News)
पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेच्या या संयुक्त प्रकल्पातून कसबा व भवानी पेठ या सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्व असलेल्या भागात ‘स्वच्छ’च्या कचरा वेचकांमार्फत १००% कचरा संकलन केले जाणार आहे.
या उपक्रमातून कचरावेचक मासिक सेवा शुल्कावर आधारित कचरा संकलन सेवा कसबा भवानी पेठेत प्रत्येक दिवशी प्रत्येक दारी देतील. खासकरून, कमी उत्पन्न असलेल्या भागात आठवड्याचे सातही दिवस ही सेवा दिली जाईल. तसेच लक्ष्मी रोड परिसरातील दुकाने व पथारी व्यावसायिकांना संध्याकाळी देखील कचरा संकलन सेवा दिली जाईल.
वस्तीतील नागरिकांना सेवा शुल्क देण्यात अडचण येते व त्यामुळे कचरा बाहेर टाकला जातो. हे टाळण्यासाठी वस्तीतील रहिवाशांसाठी सेवा शुल्काची रक्कम कमी करुन, कचरावेचकांना पुणे महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या वस्ती प्रोत्साहन भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.
दारोदार कचरा संकलन, जास्तीत जास्त कचऱ्याचे रिसायकलिंग आणि कचरावेचकांची उपजीविका सुरक्षित करणारा हा उपक्रम कसबा भवानी पेठ या भागातील कचरा व्यवस्थापनात मोठा बदल घडवत या भागाची स्वच्छता पेठ ही नवी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज होत आहे.
“कसबा पेठ महाराष्ट्राच्या इतिहासाचा मोठा वारसा जपणारा भाग आहे. मग आपला हा कसबा स्वच्छ, सुंदर, आणि विकसित केला पाहिजे. शासन आणि प्रशासन एकत्र आल्यावरच स्वच्छता साध्य होईल. प्रशासन नक्की काय करू शकते हे आम्ही सगळ्यांनीच सायकल स्पर्धेच्या वेळेला बघितले, आणि त्या साठी मनपाचे अभिनंदन करतो. पाच दिवस शहर सुंदर आणि स्वच्छ राहिले, आता हे वर्षभर असेच राहावे ही आमची अपेक्षा आहे. इंदोर स्वच्छतेत नंबर १ आहे कारण तिथे ते दंड करतात. म्हणून माझी मनपाकडूनही अपेक्षा आहे कि जे जे शहराचे विद्रुपीकरण करतात, तुम्ही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, आम्ही तुमच्या बाजूनेच असू.” असे मनोगत यावेळी मा.आमदार हेमंत रासणे यांनी व्यक्त केले.
“शासन आणि कचरा वेचकांमधील दरी कमी करायची आहे म्हणून मी खाली उतरून बोलायला सुरुवात केली. पुणे शिक्षण, आयटी, आणि विज्ञान क्षेत्रात पुढे आहे, मात्र स्वच्छतेत मागे आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच स्वच्छतेमध्येही पुणे देशात पहिले यायला हवे. कचऱ्याची समस्या सोडवायला प्रशासन आणि जनतेची ५०-५०% जबाबदारी आहे. सगळ्यांपर्यंत स्वच्छ ची दारोदार कचरा संकलनाची सेवा सात दिवस पोहोचवण्यासाठी आम्ही स्लम सबसिडी आणि बदली ची व्यवस्था अधिक सक्षमपणे आम्ही राबवणार आहोत” अशी माहिती यावेळी महापालिका आयुक्त, नवल किशोर राम यांनी दिली.
“पुणे मनपा- स्वच्छ मॉडेल आणखी सशक्त करत कचरा वेचकांना अधिक बळकट करण्यासाठी हा झिरो वेस्ट प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रशासन आणि कचरा वेचक यांची भागीदारी हीच पुण्याच्या स्वच्छतेची खरी ताकद आहे. “असे अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), पवनीत कौर यांनी सांगितले.
“जवळपास २० वर्षे स्वच्छ आणि पुणे मनपा भागीदारीत जगात नावाजलेले हे मॉडल चालवत आहेत. कचरावेचक आणि महानगरपालिका एकत्रितपणे दारोदार कचरा संकलन सेवेसोबत कचऱ्याचे वर्गीकरण, जास्तीत जास्त रिसायकलिंग, निर्मितीच्या ओल्या कचऱ्याचे खत अशा अनेक शाश्वत घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रणाली चालवत आहेत. पण मागील २० वर्षात शहर देखील मोठ्या प्रमाणात बदलले. या काळात जशी शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे प्रश्न बदलले आहेत. म्हणूनच या मॉडल मधे आणखीन सुधारणा आणि बदलांची गरज आहे. स्वच्छता पेठ या पायलट प्रकल्पातून या बदलांचे पहिले पाऊल आपण घेत आहोत.” असे यावेळी श्रीमती लुब्ना अनंतकृष्णन, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था यांनी सांगितले.

COMMENTS