Dr Vasant Gavde on Writing Skill | “लेखन म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नव्हे, तर विचार, भावना, अनुभव आणि कल्पनांचे प्रभावी शब्दरूप होय” | डॉ.वसंत गावडे
Annasaheb Waghire College Otur – (The Karbhari News Service) – २७ जानेवारी रोजी ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात लेखन सदर कार्यशाळेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ विभागामार्फत करण्यात आले होते. महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. वसंत गावडे व हिंदी विभागप्रमुख डॉ. राजेश रसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गर्दशन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कल्याण सोनावणे उपस्थित होते. अशी माहिती कार्यशाळेचे समन्वयक व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. नंदकिशोर उगले यांनी दिली. (Pune News)
पहिल्या सत्रात डॉ.वसंत गावडे म्हणाले,”मानवाने जेव्हा विचार करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना विचारांना जतन करण्याची गरज निर्माण झाली. तेव्हाच खऱ्या अर्थाने लेखनाचा जन्म झाला. लेखन म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नव्हे, तर विचार, भावना, अनुभव आणि कल्पनांचे प्रभावी शब्दरूप होय. लेखन कौशल्य हे व्यक्तिमत्त्व विकासाचे, बौद्धिक प्रगल्भतेचे आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. आजच्या युगात संवादाची अनेक साधने उपलब्ध आहेत—मोबाईल, सोशल मीडिया, व्हिडिओ—परंतु तरीही लेखनाचे महत्त्व कमी झालेले नाही, उलट ते अधिक वाढले आहे.”
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात वक्ते डॉ. राजेश रसाळ म्हणाले, “लेखन कौशल्याचे महत्त्व केवळ परीक्षांपुरते किंवा साहित्यिक क्षेत्रापुरते मर्यादित नाही. ते आपल्या दैनंदिन जीवनातही महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा आपण लिहितो, तेव्हा आपले विचार अधिक स्पष्ट होतात. लेखन ही आत्मपरीक्षणाची प्रक्रिया आहे.”
कार्यशाळेच्या अध्यक्षीय समारोप भाषणात डॉ.रमेश शिरसाट म्हणाले,”लेखन करताना आपले विचार स्पष्ट असणे अत्यंत गरजेचे असते. विचार अस्पष्ट असतील, तर लेखनही विस्कळीत होते. वाचन, निरीक्षण आणि चिंतन यांमुळे विचारांना धार येते”.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. निलेश काळे व आभार डॉ. विनायक कुंडलिक यांनी मानले. कार्यशाळेच्या आयोजनामध्ये महाविद्यालयातील डॉ. रोहिणी मदने, राजेंद्र आंबवणे, डॉ. जनार्दन नाडेकर इत्यादींनी सहभाग घेतला.

COMMENTS