Muralidhar Mohol on PMC Election Results | पुणेकरांच्या अपेक्षांना जबाबदारीने सामोरे जाऊ – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
Pune BJP – (The Karbhari News Service) – पुणेकरांनी भाजपला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत उमेदवार निवडून दिल्याबद्दल मी सर्व पुणेकरांचे मनापासून आभार मानतो. मतदान करताना पुणेकरांनी शहराच्या विकासाला, प्रगतीला आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याला प्राधान्य दिले. हीच भावना लक्षात घेऊन आम्ही सत्ता केवळ उपभोगण्यासाठी नव्हे, तर पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी जबाबदारीने काम करू, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ यांनी केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Pune News)
पत्रकारांशी संवाद साधताना मोहोळ म्हणाले की, भाजपने जाहीरनाम्याच्या माध्यमातून पुणेकरांसमोर मांडलेले संकल्पपत्र पूर्ण करण्याचे भान आम्हाला आहे. पुढील पाच वर्षांत विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत देशभरात झालेल्या विकासाचा परिणाम पुण्यातही स्पष्टपणे दिसून येतो. मेट्रो प्रकल्प, चांदणी चौकाचा विकास तसेच विविध कामांसाठी मिळालेल्या निधीमुळे शहराचा चेहरामोहरा बदलला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्याशी संबंधित अनेक प्रश्न शासनदरबारी मार्गी लावले. मागील पाच वर्षांत महापालिकेत असताना भाजपने केलेली विकासकामे जनतेसमोर मांडली. तसेच मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०४७ पर्यंत पुण्याचा विकास कसा करायचा, याचे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन नागरिकांसमोर ठेवण्यात आले. हे विचार पुणेकरांना पटल्याने त्यांनी पुन्हा भाजपवर विश्वास दाखवला, असे मोहोळ म्हणाले.
विरोधकांनी निवडणुकीदरम्यान खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका केली, जे लोकशाहीला शोभणारे नाही. त्यांच्या सत्ताकाळातील शहराच्या दुरवस्थेचा अनुभव घेत पुणेकरांनी २०१७ प्रमाणेच यावेळीही भाजपला भरघोस यश दिले. हजारो कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतल्यामुळेच हा विजय शक्य झाला. उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनीही पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले, हा विजय त्यांनाच समर्पित आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपचा हा विजय जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा कौल आहे. कार्यकर्त्यांनी नाराजी बाजूला ठेवून एकनिष्ठेने काम केले. पक्ष भविष्यात त्यांच्या त्यागाची दखल घेईल. नम्रतेने लोकांची सेवा करणे ही आपली संस्कृती असून मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानुसार बेकायदेशीर फ्लेक्सबाजी टाळावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS