PMC Solid Waste Management Department | गणेश मूर्ती विसर्जनासाठी ३८ बांधलेले हौद, २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्यांची सोय | २४१ मूर्ती संकलन केंद्रे
| ५५४ पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था
Pune Ganeshotsav 2025 – (The Karbhari News Service) – गणेशोत्सव कालावधीत पुणे महानगरपालिकेमार्फत नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार गणेशोत्सव २०२५ कालावधीमध्ये १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ३८ बांधलेले हौद, एकूण २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या याठिकाणी मूर्ती विसर्जनाची सोय तसेच ३२८ निर्माल्य कलश/कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच २४१ मूर्ती संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम (Sandip Kadam PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)
पर्यावरणपूरकरित्या गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले असून पुणे महानगरपालिकेच्या सोशल मिडीया माध्यमाद्वारे, VMDs, होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स इ.द्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच कोणीही निर्माल्य नदीपात्र, टाकू नये असे देखील आवाहन महापालिका आयुक्त यांनी सर्व पुणेकर नागरिकांना केले आहे.
पुणे महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिकांना नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याकरीता गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदाद्वारे मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात येणार आहे.
नागरिकांनी नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता जास्तीत जास्त प्रमाणात मूर्ती दान करावे याबाबत क्षेत्रिय कार्यालयांमार्फत जनजागृती करण्यात येत आहे.
क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व कृत्रिम हौद व मूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या सर्व यंत्रणाची सविस्तर माहिती www.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गणेशोत्सव २०२५ मध्ये पुणे महानगरपालिका व विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत पुनरावर्तन उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ECOEXIST संस्था, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, कमिन्स इंडिया, जनवाणी, जिवित नदी या स्वयं सेवी संस्थांमार्फत गणेश विसर्जनानंतरची शाडूची माती संकलित करून त्याचा पुर्नवापर केला जाणार आहे.
शाडू माती एक मर्यादित संसाधन असून या मातीच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. मातीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे गाळ निर्माण होऊन नदीपात्रात गाळ साठल्याने सागरी जीवनावर परिणाम होतो. या शाडू मातीचा पुर्नवापर केल्यास मूर्तीकारांना मूर्ती / माती परत देऊन त्यांना मदत करता येऊ शकते. क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ४६ ठिकाणी शाडू मूर्ती संकलन केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत.
निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकॉल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मुर्त्या किंवा त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ टाकू नयेत. हे प्रासादिक निर्माल्य एकत्र करून त्याचे खत बनवून शेतक-यांना देण्यात येते, म्हणूनच या प्रासादिक निर्माल्याचे पावित्र्य भंग पावेल अशा
कुठल्याही वस्तू किंवा इतर कचरा निर्माल्यात टाकू नये असे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.
क्षेत्रिय कार्यालयांमार्फत संकलित केलेल्या गणेश मूर्तीचे पुर्नविसर्जन करणेची व्यवस्था वाघोली येथील खाणीमध्ये तीन पाळ्यांमध्ये आवश्यक सेवक व पर्यवेक्षकीय अधिकारी नेमून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात येणार आहे.
वाघोली येथील खाणीच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूक नगररोड-वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयाकडून व सुरक्षा विभागाकडून रखवालदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रिय कार्यालयाच्या मागणीनुसार आवश्यक गाड्यांची उपलब्धता मोटार वाहन विभागाकडून करण्यात येणार आहे. या गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन सन्मानपूर्वकरित्या वाघोली येथील खाणीमध्ये करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण तसेच यांना कळविण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिकेमार्फत अग्निशामक दलाची सुसज्ज यंत्रणा ठेवण्यात येणार आहे तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत योग्य ते नियोजन करण्यात येणार आहे.
वाघोली येथे खाणीमध्ये गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन करणेबाबत परिमंडळ निहाय गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव २०२४ मध्ये १,०१, २८१ गणेश मूर्ती बांधलेल्या हौदात, २,८२,६०४ गणेश मूर्तीलोखंडी टाक्यांत, १,७६,०६७ गणेशमूर्ती दान इतके मूर्ती विसर्जन झालेले होते. तसेच एकूण ७,०६,४७८ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले होते.
गणेशोत्सव २०२४ मध्ये प्रतिदिन ३८६ पोर्टेबल टॉयलेट पुरविण्यात आले होते. यावर्षी एकूण ५५४ पोर्टेबल टॉयलेटची मागणी क्षेत्रिय कार्यालयामार्फत करण्यात आली असून त्यानुसार आवश्यक पोर्टेबल टॉयलेट पुरविण्यात येणार आहेत.

COMMENTS