PMC Contract Employees | झाडणकाम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे एजंट कडून आमिष | अमिषाला बळी न पडण्याचे उपायुक्त संदीप कदम यांचे आवाहन
Sandip Kadam PMC – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत कंत्राटदारामार्फत नेमलेल्या सेवकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. तशा तक्रारी येत आहेत. झाडणकाम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे एजंट कडून आमिष दाखवण्यात येत आहे. मात्र याला बळी न पडण्याचे आवाहन घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी केले आहे. (PMC Solid Waste Management Department)
याबाबत उपायुक्त यांनी जारी केलेल्या परिपत्रक नुसार पुणे महानगरपालिका, १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दरवर्षी आउटसोर्सिंग पद्धतीने सार्वजनिक रस्त्यांचे झाडणकाम करणेकामी ठेकेदाराची नेमणूक क्षेत्रिय कार्यालयामार्फत केली जाते. हे काम करणेकामी ठेकेदारामार्फत सेवक नेमले जातात. तथापि सेवक नेमताना काही आर्थिक देवाणघेवाण करून कंत्राटदाराच्या सेवकांना महानगरपालिकेमार्फत कायम स्वरूपाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विविध एजंट किंवा अन्य व्यक्तींमार्फत पैसे उकळले जात असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.
ठेकेदारामार्फत नियुक्त केलेल्या या सफाई सेवकांमार्फत मर्यादित कालावधीत कामकाज करून घेतले जात असल्याने त्यांना महापालिकेत कायम करणेबाबत कोणतेही प्रयोजन नाही तसेच इतर अफवांवर विश्वास ठेऊन नये व स्वतः ची आर्थिक फसवणूक टाळावी. याबाबत संबंधीत सर्व सफाई सेवकांना आपल्यामार्फत सूचित करण्यात यावे. जेणेकरून ठेकेदाराकडील सफाई सेवक यांची आर्थिक फसवणूक होणार नाही. असे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालय आणि विभागांना देण्यात आले आहेत. क्षेत्रिय कार्यालय स्तरावर याबाबत नोटीस बोर्डवर व प्रसिद्धी माध्यमे यांवर जास्तीत जास्त माहिती प्रसारित करण्यात यावी. असे उपायुक्त कदम यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान एजंट कडून तर फसवणूक होतेच शिवाय कामावर नेमताना ठेकेदार देखील या सेवकाकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. असे असले तरी सेवक मात्र तक्रार करण्यास घाबरत आहेत. यावर देखील प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

COMMENTS