Pune District Voting Awareness | जिल्हास्तरीय स्वीप कार्यक्रमाचा शनिवारवाडा येथे शुभारंभ | जिल्ह्यात १९ नोव्हेंबरपर्यंत विविध मतदार जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

Homeadministrative

Pune District Voting Awareness | जिल्हास्तरीय स्वीप कार्यक्रमाचा शनिवारवाडा येथे शुभारंभ | जिल्ह्यात १९ नोव्हेंबरपर्यंत विविध मतदार जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

Ganesh Kumar Mule Nov 08, 2024 8:48 PM

Dr Ramesh Shelar | डॉ रमेश शेलार यांची महापालिका सामान्य प्रशासन विभागाची विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार!
PMC Pune new Villages | समाविष्ट 34 गावांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे राज्य सरकारचे आदेश 
Divisional Commissioner : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्काळ ‘या’ उपाययोजना करा  : विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे महापालिकेला आदेश 

Pune District Voting Awareness | जिल्हास्तरीय स्वीप कार्यक्रमाचा शनिवारवाडा येथे शुभारंभ | जिल्ह्यात १९ नोव्हेंबरपर्यंत विविध मतदार जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

 

Pune News – (The Karbhri News Service) –  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी म्हणून नागरिकांमध्ये मतदान जनजागृतीकरीता जिल्ह्यात मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग (स्वीप) कार्यक्रम १९ नोव्हेंबरपर्यंत प्रभावीपणे राबविण्यात येणार असून त्याचा आज शनिवारवाडा येथे शुभारंभ करण्यात आला. (Vidhansabha Election 2024)

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदान करण्याबाबत शपथ दिली.

कार्यक्रमास पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवडणूक निरीक्षक अरुंधती सरकार, के. हिमावती, निवडणूक खर्च निरीक्षक प्रेमप्रकाश मीना, अमित कुमार, निवडणूक पोलीस निरीक्षक राजेश सिंह, स्वीप समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित उपस्थित होते.

कार्यक्रमाच्यावेळी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई येथील राज्यस्तरीय स्वीप कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण तसेच मतदार जनजागृतीपर पथनाट्य, गीतांचे सादरीकरण करण्यात आले.

स्वीपअंतर्गत जिल्ह्यात ९ नोव्हेंबर रोजी रांगोळी स्पर्धा, १० नोव्हेंबर रोजी पथनाट्य, ११ नोव्हेंबर मतदारजागृती विषयक स्पर्धा, १२ नोव्हेंबर मानवी साखळी, १३ नोव्हेंबर विद्यार्थ्यांकडून पालकांना संकल्पपत्र भरुन घेणे, १४ नोव्हेंबर मॅरेथॉन स्पर्धा, १५ नोव्हेंबर औद्योगिक क्षेत्रात मतदार जनजागृती मंचाच्या माध्यमातून कामगारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरीता उपक्रम, १६ नोव्हेंबर वॉकेथाॅन, सायकल व मोटारसायकल रॅली तसेच १७ ते १९ नोव्हेंबर घरोघरी भेटीद्वारे मतदानासाठी मतदारांना प्रोत्साहित करणे, मतदान केंद्र जाणून घेणे, मतदानप्रक्रियेविषयी मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये अधिकाधिक युवा, महिला, दिव्यांग, तृत्तीयपथी, ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले.

स्वीप समन्वयक श्रीमती तांबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी त्या म्हणाल्या, स्वीप उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात मतदार नोंदणीत वाढ होण्यासोबतच निवडणुकीच्यावेळी मतदानाची टक्केवारीत वाढ होण्याकरीता वर्षभरापासून मतदार जागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये युवा, महिला, दिव्यांग, तृत्तीयपथी, ज्येष्ठ नागरिक मोठ्याप्रमाणात सहभागी झाले. त्याचा परिणाम मतदारयादीत १८ ते १९ वयोगटातील नवमतदार, २० ते २९ वयोगट युवा मतदार, तृत्तीयपंथी मतदार आणि सेवा मतदारांत (सर्व्हिस वोटर्स) वाढ झाली आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी १०० टक्के मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन श्रीमती तांबे यांनी आवाहन केले.

यावेळी मान्यवरांनी शनिवारवाडा प्रागंणात मांडण्यात आलेल्या प्रातिनिधीक स्वरुपात मतदान केंद्रावर मतदारांच्या पाल्यांकरीता करण्यात येणाऱ्या येणाऱ्या सोई-सुविधा आणि मतदारांना त्यांच्या जबाबदारीबाबत माहिती देणाऱ्या सापशिडीच्या खेळाविषयी माहिती घेतली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0