Pune Fire Brigade | अग्निशमन दल घेणार “अग्निसुरक्षित गणेश मंडळ” आढावा
| गणेश मंडंळाना नोंदणी करण्याचे आवाहन
पुणे – यावर्षी पहिल्यांदाच पुणे अग्निशमन दल (PUNE FIRE BRIGADE) व फायर अँन्ड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (FSAI) यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील गणेशोत्सवाच्या काळात गणपती मंडळांनी आपले मंडळ आगीपासून सुरक्षित कसे आहे व त्याकरिता मंडळे काय उपाययोजना करतात याबाबत “अग्निसुरक्षित गणेश मंडळ” म्हणून एक स्पर्धा घेण्याचे ठरविले असून त्यामागचे उदिष्ट असे की, गणेशोत्सवाच्या काळात शक्यतो मंडळाच्या ठिकाणी कुठेही आग वा अपघात घडू नये याबाबत जागरूक राहून येणारे असंख्य भाविक यांची ही सुरक्षितता कायम राहावी. त्याबाबत सार्वजनिक मंडळांनी नोंदणी (GOOGLE FORM) करण्याचे आवाहन अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे (Devendra Potphode) यांनी केले आहे.
अग्निशमन दल व एफएसएआय (FSAI) संयुक्तरित्या पुढाकार घेऊन शहरात आग व अपघातापासून मंडळे सुरक्षित कशी राहावीत आणि जनमानसात याबाबत जागृती व्हावी या दृष्टीकोनातून हि संकल्पना साकारली आहे. मंडळांनी नोंदणीच्या करतेवेळी दिलेल्या अर्जामधे माहिती भरुन दिल्यावर त्याची छाननी होऊन अग्निशमन दलाकडील अग्निशमन अधिकारी आणि एफएसएआय संस्थेचे सदस्य हे प्रत्यक्ष मंडळांना भेटी देऊन पाहणी करतील व त्यानंतर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक असे बक्षीस जाहिर केले जाईल. तरी शहरातील जास्तीत जास्त मंडळाने सहभाग घ्यावा यासाठी आवाहन केले जात आहे.
https://forms.gle/RJ3nDrUBukAsFVkHA