आज प्रमोशन आणि आजच रिटायर!
: महापालिका कर्मचाऱ्यांची व्यथा
: सामान्य प्रशासन विभागाचा अजब कारभार
पुणे: पुणे महापालिका प्रशासन आपल्या वेगवेगळ्या प्रतापामुळे नेहमी चर्चेचा विषय बनते. मात्र यातून धडा घेण्याऐवजी प्रशासन त्याच त्याच चुका करतच राहते. महापालिका कर्मचारी नेहमी समान्य प्रशासन विभागाची तक्रार करत असतात. त्याच विभागाकडून मनपा सेवका बाबत हा प्रकार घडला आहे. टॅक्स विभागातील एका अधीक्षक पदावरील महिलेला आज विभागाने प्रशासन अधिकारी या पदावर बढती दिली आहे. मात्र त्यांचा हा आनंद फार वेळ टिकू शकला नाही. कारण संबंधित महिला आजच सेवानिवृत्त देखील झाली आहे. ही महिला अधीक्षक मागील वर्षीच या बढतीसाठी पात्र होती. मात्र सामान्य प्रशासन विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही बढती होऊ शकली नव्हती. अशा पद्धतीच्या कामामुळे विभागा विषयी नाराजी कर्मचाऱ्यांमध्ये वाढताना दिसते आहे.
: वर्ग 3 पदावरून वर्ग 2 पदावर बढती
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून कालावधी पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. शिवाय पात्र सेवकांना बढती देखील देण्यात येत आहे. त्यानुसार आज सामान्य प्रशासन विभागाने वर्ग 3 या पदावरून वर्ग 2 पदावर बढती देण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये हेमंत माजगावकर, प्रकाश मोहिते, शुभांगी परीट आणि हेमलता देशपांडे यांचा समावेश आहे. अधीक्षक या पदावरून प्रशासन अधिकारी या पदावर या बढत्या देण्यात आल्या आहेत. यातील हेमलता देशपांडे या टॅक्स विभागात अधीक्षक या पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यकाळानुसार त्यांची बढती ऑक्टोबर 2020 मध्ये होणे अपेक्षित होते. त्यासाठी त्या पात्र देखील होत्या. मात्र सामान्य प्रशासन विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही बढती प्रलंबित राहिली होती. शेवटी त्यांना आज अतिरिक्त आयुक्त कार्यालयात प्रशासन अधिकारी या पदावर बढती देण्यात आली. त्यामुळे त्यांना आनंद झाला. मात्र त्यांचा हा आनंद फार वेळ टिकू शकला नाही. कारण संबंधित महिला आजच सेवानिवृत्त देखील झाली आहे. आपण सन्मानाने निवृत्त होतोय, एवढेच एक मानसिक समाधान त्यांच्याजवळ होते. मात्र मागील वर्षांपासून त्या पात्र होत असताना देखील त्यांना बढती न मिळणे, हे ही तेवढेच दुर्दैवी आहे.
या महिलेसोबत यातील काही कर्मचारी पुढील दोन ते तीन महिन्यात निवृत्त होणार आहेत. याआधी देखील बढतीसाठी पात्र असताना काही अधीक्षक अभियंत्यांना त्यांच्या सेवानिवृत्त होण्याअगोदर बढती देण्यात आली होती. अशा पद्धतीच्या कामामुळे विभागा विषयी नाराजी कर्मचाऱ्यांमध्ये वाढताना दिसते आहे.
COMMENTS