शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा
| माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांची मागणी
पुणे | नुकत्याच पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या. लवकरच इतर कर्मचाऱ्यांच्या पण बदल्या करण्यात येणार आहेत महानगरपालिकेत वर्ग एक ते तीन मधील अधिकाऱ्यांच्या दर तीन वर्षांनी बदल्या कराव्या असा नियम आहे. तोच नियम शिक्षण विभागात पण लावण्यात यावा आणि बदल्या करण्यात याव्यात. अशी मागणी माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
खर्डेकर यांच्या निवेदनानुसार पुणे मनपाच्या शिक्षण विभाग कार्यालयात वर्षानुवर्षे तेच ते अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. अनेक वर्षापासून एकाच विभागात काम करत असल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्यात सुद्धा उद्दामपणा आला आहे. तेथे छोट्या छोट्या कामांसाठी सुद्धा नागरिकांना खूप खेटे घालावे लागतात. कर्मचारी जागेवर नसतात. शिक्षकांची कामे, तसेच रिटायर झालेल्या शिक्षकांची पेन्शनची कामे , नागरिकांची कामे सुद्धा वेळेवर होत नाही त्यांना कार्यालयात खूप चकरा माराव्या लागतात. पूर्वी शिक्षण मंडळ स्वतंत्र होते; परंतु दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेत शिक्षण मंडळ विलीन होऊन इतर समित्यांप्रमाणे शिक्षण समिती झाली आहे. मात्र अद्यापही तेथील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केलेल्या नाहीयेत.
खर्डेकर यांनी पुढे म्हटले आहे कि मी शिक्षण समिती अध्यक्ष असताना अनेक नगरसेवक, नागरिक, रिटायर शिक्षक माझ्याकडे कर्मचाऱ्यांविषयी तक्रारी घेऊन येत असत. येथील कर्मचाऱ्यांचे बदल्या करा म्हणून मागणी करत असत. त्यानुसार आम्ही शिक्षण समितीने ठराव करून येथील कर्मचाऱ्यांच्या इतर मनपा च्या विभागाप्रमाणे वेगवेगळ्या खात्यात बदल्या करण्यात याव्या. असा ठराव देखील केला होता; मात्र अद्याप बदल्या झालेल्या नाहीत.
—
महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी आहे की शिक्षण विभागातील किमान ८०% कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतर खात्यात बदल्या करण्यात याव्यात. जेणेकरून तेथील अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपून नागरिकांची कामे वेळेवर होतील.
– मंजुश्री संदीप खर्डेकर, माजी शिक्षण समिती अध्यक्ष