Feedback about the city | केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात सहभागी होत शहराविषयी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

HomeBreaking Newsपुणे

Feedback about the city | केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात सहभागी होत शहराविषयी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

Ganesh Kumar Mule Nov 28, 2022 3:37 PM

PMC Pune Employees | BLO म्हणून कामकाज करण्यास महापालिका कर्मचाऱ्यांची टाळाटाळ | जिल्हा प्रशासनाकडून तक्रार 
Hong Kong Lane Pune | Pune PMC | महापालिका प्रशासनाकडून मुख्य सभेच्या ठरावाचा अवमान | महापालिकेचे लाखोंचे नुकसान
Chandni Chowk traffic jam | चांदणी चौक वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी गतीने कार्यवाही

केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात सहभागी होत शहराविषयी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

पुणे|केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने देशातील २६४ शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी शहराबद्दल आपला अभिप्राय नोंदवण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले आहे. ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स-२०२२’ अंतर्गत हे नागरिक जाणीव सर्वेक्षण (सिटीझन पर्सेप्शन सर्व्हे- सीपीएस) २३ डिसेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार असून पुणे शहरातील नागरिकांनी ऑनलाईनरित्या या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी शहरी परिणाम फ्रेमवर्क २०२२ (अर्बन आऊटकम फ्रेमवर्क-युओएफ २०२२) चा शुभारंभ केला. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने २०१८ मध्ये १११ शहरांचा समावेश असणारा पहिला ‘राहणीमान सुलभता निर्देशांक’ जारी केला. त्यानंतर पाठोपाठ २०१९ मध्ये राहणीमान सुलभता निर्देशांक २.० आणि महानगरपालिका कामगिरीचा निर्देशांक जाहीर झाले. शहरांना परिणामावर आधारित नियोजन आणि शहरी व्यवस्थापनाकडे वाटचाल करण्यास मदत करणारा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जाते.

शहरी परिणाम फ्रेमवर्क २०२२ चा उद्देश हा विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती उपलब्ध करून देऊन शाश्वत विकास आणि सामाजिक-आर्थिक प्रगती साध्य करण्याची प्रक्रिया सुलभ करणे हा आहे. जनसांख्यिकी, आर्थिक, शिक्षण, ऊर्जा, वित्त, पर्यावरण, प्रशासन आणि माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, आरोग्य, गृहनिर्माण, गतिशीलता, नियोजन, सुरक्षितता आणि सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन, पाणी व सार्वजनिक स्वच्छता यांसारख्या क्षेत्रांमध्ये संपूर्ण शहरातील परिणामांवर आधारित पारदर्शक व सर्वसमावेशक माहितीसंग्रह विकसित करण्याचा हा उपक्रम आहे.

या फ्रेमवर्कमध्ये विविध क्षेत्रांमधील एकूण ४५० पेक्षा अधिक निर्देशांकांचा समावेश असून १४ क्षेत्रांमधील माहिती सुव्यवस्थित केली जाईल. माहिती संकलनावर अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जाईल जेणेकरुन विस्कळीत माहितीचे विश्लेषण केले जाऊ शकते. तसेच संकलित माहितीसंग्रह विषय तज्ज्ञांद्वारे मानांकनासाठी वापरला जाऊ शकेल.

सिटीझन पर्सेप्शन सर्व्हे अंतर्गत https://eol2022.org/CitizenFeedback या लिंकवर अधिकाधिक नागरिकांनी आपला शहराबद्दलचा अभिप्राय नोंदवावा तसेच क्यूआर कोडचाही उपयोग करावा, असे आवाहन पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी केले आहे.