२ लाख ७५ हजार ६७९ मतदार तर २७० मतदान केंद्रावर होणार मतदान
| कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान साहित्याचे वितरण
पुणे | कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते आणि उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.
कसबा पेठ विधानसभा मतदार संघात रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघामध्ये एकूण २ लाख ७५ हजार ६७९ मतदार असून २७० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. २६ फेब्रुवारीच्या मतदान प्रक्रियेसाठी १ हजार २५० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येकी १० याप्रमाणे २७ टेबलवर मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.
साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना घ्यावयाची काळजी याबाबत मागदर्शन करण्यात आले. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी २७ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदानादिवशी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून यंत्रणा सज्ज झाली आहे. ६०० पोलीस कर्मचारी व ८३ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
*मतदान कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्था*
मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या मतदार केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये पीएमपीएमएलच्या ४३ बसेस, ७ मिनीबस आणि १० जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी साहित्य वितरण ठिकाणी वाहतुक व्यवस्थेचा तपशील दर्शनी भागात लावण्यात आला होता.
*टपाली मतदानाची सुविधा*
निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांपैकी ५४ कर्मचारी कसबा पेठ मतदारसंघातील मतदार आहेत. त्यांच्यासाठी साहित्य वितरण ठिकाणी टपाली मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणादरम्यान या ५४ कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठीचे अर्ज देण्यात आले होते. त्यानुसार आज संबंधित कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
00000