अफगाणिस्तान समस्येमुळे ‘सीएए’चे महत्व स्पष्ट
: चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
पुणे: केंद्र सरकारने ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ (सीएए) आणल्यानंतर विरोधी पक्षाने त्यावर जोरदार टीका केली. मात्र अफगाणिस्तानमधील घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय कसा योग्य आहे, याची प्रचिती आता सर्वांनाच आली असून त्याचे महत्व स्पष्ट झाले आहे. या कायद्यामुळे अफगाणिस्तान येथील हिंदू नागरिकांना भारतात आणताना फारशा अडचणी आल्या नाहीत, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
: अल्पसंख्यांक समाजाच्या प्रतिनिधींच्या वतीने सत्कार
केंद्रात सत्ताधारी असलेल्या मोदी सरकारने सीएए कायद्याच्या माध्यमातून बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख या सहा धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सत्कार पुणे शहरातील या अल्पसंख्यांक समाजाच्या प्रतिनिधींच्या वतीने करण्यात आला. गुरुसाहेब ग्रंथाची प्रतिमा, पुष्पगुच्छ, तसेच शीख समाजाचे प्रतीक असलेली पगडी देऊन हा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. आमदार सुनील कांबळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे कार्यवाह महेश करपे, भाजपाचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर सरचिटणीस दीपक नागपुरे यांच्यासह इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले, शीख वर्ल्ड इंडियाचे अध्यक्ष अजितसिंह राजपाल, गुरुनानक दरबार कॅम्पचे अध्यक्ष संतसिंह मोखा, दिलीप मेहता, चरणजित सिंग, गुरुवार पेठ बौद्ध विहाराचे राजाभाऊ भोसले, वाल्मीकी तसेच इतर समजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपने कधीही कोणत्याही धर्मामध्ये फरक केलेला नाही. प्रत्येक धर्मातील नागरिकांचा आदरच केला आहे. मात्र असे असतानाही नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणल्यानंतर मुस्लिम समाजाला दूर करण्यासाठी हा कायदा आणल्याची टीका विरोधी पक्षांनी केली. हा कायदा किती महत्वाचा होता, याची जाणीव आता त्यांना झाली आहे. या तीन देशात राहणाऱ्या हिंदूंना भारताचे नागरिकत्व देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला तर विरोधकांच्या पोटात दुखायचे कारण काय? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी विचारला. अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या पाठीशी भाजप कायमस्वरुपी राहणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना ७० वर्षात जो निर्णय घेता आला नाही. तो निर्णय घेण्याचे धाडस पंतप्रधान मोदी यांनी दाखविले. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे इतर देशात राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना नागरिकत्वाचा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना व्यक्त करत या समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या नियमाचे पालन करत मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन भाजपचे शहर उपाध्यक्ष श्रीपाद ढेकणे यांनी केले.
COMMENTS