40% करसवलती बाबत पुणेकरांना कोण दिलासा देणार? राज ठाकरे कि चंद्रकांत पाटील!
पुणेकरांच्या 40% करसवलत बाबत पुणेकरांना दिलासा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढे आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत ठाकरे यांनी बाबत पुणेकरांना दिलासा देणारा निर्णय राज्यशासनाने घ्यावा अशी मागणी केली. दरम्यान पुण्याचे पालकमंत्री यांनी देखील नुकतीच याबाबत मंत्रालयात भेट घेतली होती. गणेश बिडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. यावरून पुणेकरांना याबाबत नेमका कोण दिलासा देणार? राज ठाकरे कि चंदक्रांत पाटील, अशी चर्चा आता केली जाऊ लागली आहे.
राज्यशासनाच्या आदेशानुसार शहरातील नवीन निवासी मिळकतींना कर आकारणी करताना 1970 पासून दिली जाणारी 40 टक्के करसवलत महापालिकेने रद्द केली आहे. तसेच, 2019 पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा 40 टक्के सवलतीचा फरक भरण्यासाठी तब्बल 95 हजार पुणेकरांना नोटीसा बजाविण्यात आली आहे.
त्यावरून राजकीय पक्ष तसेच शहरातील नागरिक आक्रमक झाल्याने महापालिका आयुक्तांनी तांत्रिक चुकीमुळे हे मेसेज गेल्याचे सांगत पुढील निर्णय होई पर्यंत नागरिकांनी ही फरकाची रक्कम भरू नये असे आदेश काढले. आता मनसे अध्यक्षांनी या विषयात लक्ष घालत थेट मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आता राज ठाकरे यांचे ऐकणार कि चंद्रकांत पाटील यांचे याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.