प्रशासक विक्रम कुमारांनी सादर केलेल्या बजेटबाबत शिवसेना आणि काँग्रेस शहर अध्यक्षांना काय वाटते?
रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणारे संतुलित बजेट | नाना भानगिरे
शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले, शहराच्या विकासाला चालना देणारे अतिशय चांगले बजेट महापालिका आयुक्तांनी सादर केले आहे. समाविष्ट गावासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. कुठलीही कर वाढ करू नये म्हणून भाजप आणि शिवसेनेने आयुक्ताकडे मागणी केली होती. त्याला यश आले, असे म्हणावे लागेल. या बजेटमुळे रखडलेल्या प्रकल्प पुरे होतील. पाणी योजनेसाठी चांगल्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजना, नदी सुधार योजना मार्गी लागण्यास मदत मिळेल. एकंदरीत हे शहरासाठी अगदी योग्य आणि चांगले बजेट आहे.
—-
भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन केलेले नियोजनशून्य बजेट – अरविंद शिंदे
बजेटवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, या बजेटमधून शहरासाठी कुठलेही शाश्वत आश्वासन देण्यात आलेले नाही. आयुक्तांना संतुलित बजेट करता आलेलं नाही. कारण चालू बजेटमध्येच 2000 कोटीची वित्तीय तूट दिसून आलेली आहे. तरीही आयुक्तांनी साडेनऊ हजार कोटींचे बजेट सादर केले आहे. भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन बजेट करण्यापेक्षा नागरिकांना सोबत घेऊन केले असते तर चांगले झाले असते. या बजेटमध्ये उत्पन्नाचा कुठलाही नवीन स्रोत नाही. समाविष्ट गावांसाठी कुठलेही ठोस नियोजन नाही. समान पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेल्या बॉन्डवर किती व्याज दिले, त्याचा कसा विनियोग केला, याबाबत कुठलेही तारतम्य दिसून आलेलं नाही. या बजेटमधून करदात्याला कसलाही उलगडा होत नाही. शहरात नवीन उद्याने कुठे होणार, त्याचे आरक्षण कुठे आहे, नवीन शाळा कुठे उभ्या राहणार, याबाबत काही उलगडा केलेला नाही. फक्त नवीन फ्लॅट कसे उभे राहतील हे दिसते आहे. एकंदरीत बजेटमधून तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले आहे. एकूणच दूरदृष्टी नसणाऱ्या आणि नियोजनशून्य भाजप नेत्यांना सोबत घेऊन केलेले हे बजेट आहे.